लखनौ : २५ एप्रिल रोजी नेपाळबरोबरच उत्तर भारतात भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला होता. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी म्हणजेच काल पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी नेपाळसह उत्तर भारत हादरला. त्यामुळे पुन्हा प्रचंड हानी झाली आहे. यासंदर्भात वैज्ञानिकांनी भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सातत्याने सुरू राहणारच, असा दावा केला आहे.
सुरूच राहणार भूकंपाचे सत्र; वैज्ञानिकांची प्रतिक्रिया
भारत आणि नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के बसणार असल्याचे संकेत ६ एप्रिल रोजी दिले होते. भूगर्भातील प्लेटा घसरल्याने हिमालयात क्षणात उलथापालथ झाली. त्यामुळे नेपाळसह उत्तर भारतातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, भोपाळच्या आयसेक्ट विद्यापीठातील भौतिक विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. सूर्यांशू चौधरी यांनी २५ एप्रिल रोजी झालेल्या भूकंपाने भूगर्भातील हालचाली सुरू असून, भूकंपाचे हे धक्के सातत्याने सुरूच राहणार, असे म्हटले आहे. पृथ्वी मोठ्या प्रमाणात फाटल्यास पृथ्वीच्या आतील ऊर्जा बाहेर पडू शकते. जोपर्यंत भूगर्भातील ही ऊर्जा बाहेर पडणार नाही, तोपर्यंत भूकंपाचे धक्के बसत राहणार. आज जे धक्के बसलेले आहेत, त्याचेही मूळ कारण हेच आहे, असेही वैज्ञानिकांनी म्हटले आहे.