पोटातील बाळाला बाहेर काढण्यासाठी महिलेला ५४ दिवस ठेवले जिवंत

brain-dead
वॉशिंग्टन – अमेरिकेत एका ‘ब्रेन डेड’ महिलेचा देह तब्बल ५४ दिवस जिवंत ठेवण्यात आले. तिच्या पोटात आकाराला आलेल्या बाळाला जिवंत बाहेर काढण्यासाठीच डॉक्टरांना हा विलक्षण खटाटोप करावा लागला. अमेरिकन डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मृत आईच्या बाळाचा जन्म झाला. जीवन-मृत्यूचा हा प्रवास हृदय हेलावून टाकणारा असाच आहे.

ओमाहा स्थित मेथडिस्ट हेल्थ सिस्टीममध्ये २२ वर्षीय कार्ला पेरेज या ‘ब्रेन डेड’ महिलेचे बाळंतपण पार पडले. या बाळाचे ‘एन्जेल’ असे नामकरण करण्यात आले आहे. जन्माच्या वेळी या बाळाचे वजन १.३ किलोग्रॅम होते. अखेर बाळाच्या जन्मानंतर दोन दिवसांनी कार्लाचा मृत्यू झाला.

यावर्षी, ८ फेब्रुवारी रोजी कार्ला पेरजे ही महिला आपल्या राहत्या घरात घसरून पडली आणि बेशुद्ध झाली. त्यानंतर आपले डोके दुखत असल्याचे तिला जाणवत होते. काही दिवसानंतर कार्ला अचानक पुन्हा बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला इस्पितळात दाखल करण्यात आले. तेव्हा तिच्या मेंदूत रक्तस्राव होत असल्याचे समजले. त्यानंतर काही वेळातच कार्लाला डॉक्टरांनी ‘ब्रेन डेड’ घोषित केले.

यावेळी कार्लाच्या पोटातला गर्भ २२ आठवड्यांचा होता. तेव्हाच या बाळाला जन्म देणे शक्य नव्हते. त्यामुळे, डॉक्टरांनी आठ आठवडे कार्लाला इन्क्युबेटरवर जिवंत ठेवले. त्यामुळे ३२ व्या आठवड्यात तिचे बाळंतपण करणे शक्य झाले. १०० डॉक्टर-परिचारिकांच्या चमूने हे ऑपरेशन केले आणि बाळाला सुखरूप ‘मृत’ आईच्या पोटातून बाहेर काढण्यात आले.

कार्लाच्या कुटुंबीयांनी बाळंतपणानंतर तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, इतरांनाही नवे जीवदान मिळणार आहे. यापूर्वी, १९९९ सालीही एका अमेरकन ब्रेन डेड महिलेने मुलाला जन्म दिला होता.

Leave a Comment