ताजमहालात शहाजहान उरूसात ८१० मीटरची चादर

shahajahan
आग्रा – ताजमहाल या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळी येत्या १५ मे पासून सुरू होत असलेल्या बादशहा शहाजहान उरूसात यंदा ८१० मीटर लांबीची चादर चढविली जाणार आहे. खुद्दाम ए रोजा कमिटीतर्फे ही सतरंगी चादर तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या तीन दिवसांच्या उरूसाची सुरवात १५ मे रोजी गुस्ल की रस्मने होणार असून शेवटच्या दिवशी ही भली थोरली चादर चढविण्याचा कार्यक्रम होणार आहे.

गेली २० वर्षे अशा लांब चादरी या उरूसादरम्यान चढविल्या जात असून प्रत्येक वर्षाला चादरीची लांबी वाढविली जाते असे कमिटीचे प्रमुख ताहरूद्दीन ताहिर यांनी सांगितले. ते म्हणाले गतवर्षी ७२० मीटर लांबीची चादर चढविली गेली होती. ही चादर हे एकतेचे प्रतीक असते आणि ही चादर चढविताना हजारोच्या संख्येने जमलेले श्रद्धाळू चादर वाहून नेण्यास हातभार लावत असतात.

Leave a Comment