भूकंपामुळे २ लाख विदेशी पर्यटकांनी नेपाळकडे फिरविली पाठ

nepal
काठमांडू : प्रलयंकारी भूकंपाने नेपाळमधील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला असून या उद्योगाचे सुमारे १ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नेपाळ हे हिमालयाच्या कुशीत वसलेले असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात येथे विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात.

मात्र यंदाच्या भूकंपामुळे सुमारे २ लाख विदेशी पर्यटकांनी आपले नेपाळ पर्यटन रद्द केले आहे. तर एकूण व्यवसायाच्या ७५ टक्के व्यवसायाला यामुळे फटका बसला आहे. पर्यटनाचा नेपाळच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. नेपाळमध्ये पर्यटनासाठी जाणा-या पर्यटकांच्या एकूण संख्येपैकी २० टक्के भारतीय पर्यटक असतात. मात्र भूकंपामुळे भारतीयांनीही नेपाळला जाणे टाळले असून नेपाळमधील अनेक पर्यटन स्थळेही यात उद्ध्वस्त झाल्याने पर्यटन व्यवसायाच्या तोट्यात भर पडली आहे. नेपाळमध्ये भारतीयांच्या व्यतिरिक्त चीन, युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्टड्ढेलिया येथूनही मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात.मात्र सध्या नेपाळमधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळही बंद असल्याने पर्यटन व्यवसायाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या ५ लाख कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. त्यातच नेपाळला वारंवार बसणा-या भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण असून पुन्हा बसलेल्या ४.३ रिश्टर स्केलच्या धक्क्याने नागरिकांची अस्वस्थता वाढली आहे. भूकंपाचा धसका घेतलेले हे नागरिक अजूनही रस्त्यावरच राहत असून त्यांच्यापर्यंत चांगल्या प्रतीचे अन्न व पाणी पोहोचविण्याचे प्रमुख आव्हान सध्या नेपाळमध्ये कार्यरत असलेल्या बचावपथकांसमोर आहे. या भूकंपात सुमारे एक लाख ६० हजार घरे उद्ध्वस्त झाल्याने नेपाळ सरकारने ताडपत्री व तंबूंच्या आयातीवरील कर उठवला आहे.

Leave a Comment