लांब दाढीत स्वच्छतागृहात असणार्‍या जंतूंपेक्षाही अधिक जंतू असू शकतात

berad
लंडन – सध्या ब्रिटनमधील तरुणांमध्ये दाढी वाढविण्याचे प्रमाण वाढत असताना, दाढीत स्वच्छतागृहात असणार्‍या जंतूंपेक्षाही अधिक जंतू असू शकतात असा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आल्याने लांब दाढी आरोग्यास घातक ठरू शकते. दाढी वाढविण्याची फॅशन ब्रिटनच्या तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय होत आहे. नक्षीकाम केलेली लहान किंवा मोठी दाढी तरुणांसाठी घातक ठरू शकते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यासंदर्भातील अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला.

मायक्रोबॉयलॉजिस्ट जॉन गोलोबिक यांनी दाढीचे अनेक नमुने तपासल्यावर काही दाढींमध्ये स्वच्छतागृहात आढळणारे जिवाणू आढळून आले आहेत, तर काही जणांच्या दाढीत सामान्य जिवाणू आढळून आले. दाढी वाढविल्यानंतर त्याची योग्य निगा राखण्यात न आल्याने दाढीत इतकी अस्वच्छता आढळली की त्याची तुलना स्वच्छतागृहात आढळून येत असलेल्या जंतूंशीच केली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले. केवळ फॅशन म्हणून दाढी वाढविणार्‍या या तरुणांसाठी अहवातील हा इशारा आरोग्यास अतिशय धोकादायक ठरू शकतो. दाढी वाढवायची असेल तर हात स्वच्छ धुणे आवश्यक असून, हात शक्यतो चेहर्‍यापासून दूर ठेवावा असे गोलाबिक यांनी स्पष्ट केले आहे. उत्तम आरोग्यापेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची नसल्याने दाढीची योग्य निगा राखणे अत्यंत गरजेचे आहे. अहवालातील हा इशारा इतर देशांसह भारतीतील नागरिकांच्या दृष्टीनेही उपयुक्त असल्याने दाढी वाढविणार्‍या प्रत्येकाने आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे.

Leave a Comment