यंदा २० ते २२ फुटांचे असणार अमरनाथ लिंग

lingam
येत्या २ जुलै पासून सुरू होत असलेल्या अमरनाथ यात्रेत जाणार्‍या भाविकांसाठी एक चांगली बातमी आहे. यात्रा सुरू झाल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसांत पोहोचणार्‍या भाविकांना यंदा पूर्ण उंचीचे म्हणजे २० ते २२ फुटाचे हिमशिवलिंग पार्वती आणि गणेशासह पाहता येणार आहे. अनेक वर्षांनंतर प्रथमच असे पूर्ण उंचीचे लिंग तयार झाले आहे. त्याच्या रक्षणासाठी यात्रा बोर्डाने गुहेत सुरक्षा रक्षकांची व्यवस्था केली असून हे रक्षक शून्य ते उणे १५ तापमानात गुहेत मुक्काम ठोकून आहेत असे समजते.

यंदा काश्मीरात प्रचंड हिमवृष्टी झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून यंदा बर्फानी बाबा पूर्ण स्वरूपात दर्शन देणार आहेत असे यात्रा बोडाचे अधिकारी सांगत आहेत. १४५०० फूट उंचीवर असलेल्या गुहेत हे लिंग आपोआप तयार होत असते आणि त्याच्या दर्शनासाठी लक्षावधींच्या संख्येने भाविक ही कठीण यात्रा करत असतात. यंदा बोर्डाने लिंगाचा हा आकार कायम राहावा म्हणून रक्षक नेमले आहेत. सरकारकडे प्रथम रक्षक पुरविण्याची मागणी केली गेली होती मात्र अति थंडीमुळे सरकारने रक्षक पुरविण्यास नकार दिल्याने यात्रा बोर्डाने स्वतःच ती व्यवस्था केली आहे. सध्या या यात्रामार्गावर २० फूट उंचीचा बर्फ आहे.

Leave a Comment