मोबाईल पोर्टेबिलिटीला मुदतवाढ

mobile
नवी दिल्ली : केंद्र सरकारने गेल्याच वर्षी मोबाईल पोर्टेबिलिटीची (एमएनपी) घोषणा केली होती आणि वर्षभरात म्हणजेच ३ मेपर्यंत ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असे जाहीरही करण्यात आले होते. परंतु तांत्रिक गुंतागुंतीमुळे निश्चित मुदतीत ही सेवा सुरू न झाल्याने आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे दोन महिन्यांत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगण्यात आले.

टेलिकॉम कंपन्यांना केंद्र सरकारने दिलासा देत मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी लागू करण्याची मुदत आणखी दोन महिन्यांनी वाढविली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यांनी मोबाईल पोर्टेबिलिटीसाठी हार्डवेअर, सॉफ्टवेअर लावले आहे आणि अंतर्गत चाचणी शेवटच्या टप्प्यात आहे. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीशी संंबंधित चाचणी लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत मोबाईल पोर्टेबिलिटी सुरू होईल. यातून ग्राहक आणि ऑपरेटर्सचीही सोय होईल. एवढेच नव्हे, तर ऑपरेटर्सनी येत्या दोन महिन्यांत ही सेवा सुरू करण्याचे आश्वासनही दिले आहे. ही सेवा ३ मेपासून देशभरात सुरू होणार होती. परंतु ही सेवा सुरू होण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. देशभरात मोबाईल पोर्टेबिलिटी लागू करण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधीकरणने (ट्राय) ३ नोव्हेंबर २०१४ रोजी मंजुरी दिली होती. या शिफारशी ६ महिन्यांच्या आत लागू करायच्या होत्या. त्यासाठी दूरसंचार विभागाने आवश्यक पाऊलही उचलले होते. एवढेच नव्हे, तर ट्रायने २५ फेब्रुवारी २०१५ रोजी नियमावलीही जारी केली होती. आता चालू क्रमांक दुस-या नेटवर्किंगवर सुरू करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तांत्रिक जटिलतेमुळे ही मुदत वाढवून दिली आहे.

Leave a Comment