हृदयविकारामुळे मुंबईत दररोज ८० लोकांचा मृत्यू

heart-attack
मुंबई : हृदयविकारामुळे घड्याळाच्या काट्यावर धावणा-या मुंबईत दररोज सरासरी ८० जणांचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून मार्च २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत झालेल्या मृत्यूमधील सर्वाधिक मृत्यू हृदयविकारामुळेच झाले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत दररोज सरासरी ६७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

मुंबई महापालिकेने माहिती अधिकार कायद्यांतर्गत, गेल्या वर्षभरात विविध आजारांमुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची आकडेवारी दिली आहे, ती मुंबईकरांना धडकी भरवणारीच आहे. मुंबईत २०१४-१५ मध्ये विविध आजारांनी एकूण ९३ हजार २५४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात ३१ टक्के रुग्ण हृदयविकारामुळे दगावले आहेत. मार्च २०१४ ते मार्च २०१५ या एक वर्षाच्या कालावधीत सुमारे २९ हजार ३९३ जणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे, म्हणजेच दररोज ८० जणांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला आहे.

गेल्या वर्षी या कालावधीत २४ हजार ६०३ जण हृदयविकाराच्या झटक्याने दगावले होते. हा आकडा वाढणं ही धोक्याची घंटाच मानली जातेय. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती मागवली होती.

त्यानुसार, गेल्या पंधरा वर्षांत विविध आजारांनी मृत्यू झालेल्या रुग्णांत हृदयविकाराचे रुग्ण अधिक आहेत. त्या खालोखाल, टीबीच्या (क्षयरोग) रुग्णांचा नंबर लागतो, तर तिस-या क्रमांकावर कॅन्सर रुग्ण दिसतात. २०१४-१५ या कालावधीत दररोज १९ मुंबईकरांचा टीबीने, तर १८ जणांचा कॅन्सरने मृत्यू झाला आहे, अशी माहिती कोठारी यांनी दिली. मुंबईकरांची लाईफस्टाईल, वेळी-अवेळी काम, कामाचा ताण, खाण्या-पिण्याच्या सवयी, पुरेसा व्यायाम नसणं या सगळ्या बाबी हृदयविकाराला आमंत्रण देणा-या ठरत आहेत. म्हणूनच इतर ठिकाणांपेक्षा मुंबईत हार्ट अटॅकनं मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे, याकडे जे. जे. हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. एन. ओ. बन्सल यांनी लक्ष वेधले.