आता अ‍ॅण्ड्रॉईड, आयओएसचे अ‍ॅप्स मायक्रोसॉफ्टच्या स्मार्टफोनवर

microsoft
मुंबई : आता गुगलच्या अँड्रॉईड आणि अ‍ॅपलच्या आयओएसवर चालणारे अ‍ॅप्सही मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर चालणा-या स्मार्टफोनवर मिळणार आहेत. मायक्रोसॉफ्टच्या निर्णयामुळे विंडोज फोन यूझर्समध्ये आनंदाचे वातावरण आहे. विंडोज फोन्स लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

जगातील दुस-या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या घोषणेमुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. विंडोजचे कॉम्प्युटर जगभरात लोकप्रिय आहेतच, मात्र अ‍ॅप्सचे फारसे पर्याय उपलब्ध नसल्यामुळे टॅब्लेटस आणि स्मार्टफोन्सना फारसा लोकाश्रय मिळू शकला नाही. दुसरीकडे अँड्रॉईड आणि आयओएसला यूझर्सनी चांगलीच पसंती दिली आहे.

नव्या निर्णयामुळे लाखो नवीन ग्राहक मिळण्याची अपेक्षा मायक्रोसॉफ्टने व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे अ‍ॅप डेव्हलपर्स विंडोज फोन्ससाठीही नवीन अ‍ॅप्स तयार करतील अशी अपेक्षा केली जात आहे. भारतातील यूझर्स बहुतांश फेसबुक, व्हॉटसअ‍ॅपसारख्या अ‍ॅप्सनाच पसंती देतात. ही अ‍ॅप्स तिन्ही प्रकारच्या फोनवर उपलब्ध असल्यामुळे भारतात विशेष फरक पडणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment