शक्य तितक्या लवकर अंतराळात वस्ती करा; शास्त्रज्ञ हॉकिंगची सूचना

sthphan
सिडनी : आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करून अंतराळ संशोधनात महत्त्वाचे योगदान देणारे शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी मानवजातीला शक्य तितक्या लवकर अंतराळात वस्ती करण्याचा इशारा दिला आहे.

केंब्रिज येथील आपल्या कार्यालयातून हॉकिंग यांनी होलोग्राफिक तंत्रज्ञान वापरून ऑस्ट्रेलियातील सिडनी ऑपेरा हाऊस येथील श्रोत्यांशी संवाद साधला त्या वेळी त्यांनी हा इशारा दिला. पृथ्वीवरील वातावरण दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), मानवी स्वभावातील आक्रमकता आणि क्रौर्य यामुळे मानव जातीपुढील आव्हाने वाढत आहेत. त्यामुळे पुढील १००० वर्षांत येथील वातावरण मानवजातीच्या अस्तित्वाला पोषक राहणार नाही. मानवजातीचे अस्तित्व टिकवायचे असेल तर आपण शेजारील ग्रहांवर आणि अंतराळात तातडीने वस्ती करण्यास सुरुवात केली पाहिजे. त्याकडे मानवजातीच्या अस्तित्वाचा विमा अशा अर्थाने पाहिले पाहिजे, असे हॉकिंग म्हणाले. आपले विश्व कसे अस्तित्वात आले, विश्वाच्या अफाट पसा-यात आपली नेमकी काय भूमिका आहे, येथील घटकांचा परस्पर संबंध काय आहे, अंतराळातील विविध घटनांचा कार्यकारणभाव काय आहे, या सर्वांचा आपण साकल्याने विचार केला पाहिजे. आपले लक्ष आपल्या पायांकडे नाही तर आकाशातील ता-यांवर असले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Leave a Comment