यांत्रिक नांगराचे शेतक-याने जुळविले ‘जुगाड’

farmers
पुणे -गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. मात्र नेहेमीच चाकोरीबद्ध आयुष्य जगणा-यांना या वचनाची वास्तविक प्रचीती येत नाही. त्यासाठी चाकोरी ओलांडून बाहेर पडून संघर्षाला सामोरे जाण्याची आवश्यकता असते. मात्र त्यामधून जे घडून येते ते असामान्य असते. असेच संघर्षपूर्ण आयुष्य जगून केवळ जुनी मेट्रीक म्हणजे ११ वी पास असलेल्या उरुळी कांचन येथील शेतकरी पोपट हरिभाऊ ढवळे यांनी यांत्रिक खुरपणी यंत्र, यांत्रिक नांगर बनविण्याची कामगिरी केली आहे. त्यांच्या या कारागिरीचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. आता प्रतीक्षा आहे ती त्यांच्या या कामगिरीची दखल शासकीय यंत्रणा आणि उद्योगांनी घेण्याची!

ढवळे यांचा जन्म नायगाव पेठ येथे गरीब शेतमजूर कुटुंबात झाला. अर्थातच त्यांचे लहानपण आर्थिकदृष्ट्या हलाखीत गेले. त्या काळात सायकल देखील गावात दुर्मीळ होती. शेजार-पाजारच्या कुटुंबात यात्रा-जत्रांच्या निमित्ताने सायकलवरून नातेवाईक, मित्रमंडळी येत असत. यावेळी त्या कुटुंबातील मुले ती सायकल घेऊन गावात हिंडत असत. यावेळी ढवळे यांना त्या सायकलच्या मागे पळण्यास त्यांचे मित्र नकार देत. त्यावेळी आपल्या आजूबाजूच्या घरी नातेवाईक येतात. आपल्याकडेच का येत नाहीत; असा प्रश्न ढवळे यांनी आपल्या माता पित्यांना विचारला. त्यावेळी मिळालेले उत्तर ढवळे यांच्या मनावर कायमस्वरूपी कोरले गेले. ते उत्तर असे होते की; “बाळा, त्यांच्याकडे चहात घालायला दूध आहे. आपल्याकडे ते नाही. त्यामुळे आपल्याकडे लोक येत नाहीत.”

या परिस्थितीतही ढवळे यांनी आई वडील यांच्या बरोबर मजुरी करणे, मधाची पोळी उतरविणे, सायकलचे पंक्चर काढणे; असे उद्योग करीत ११ वी पर्यंत शिक्षण घेतले. ११ वी उत्तीर्ण झाल्यानंतर बिजली बल्ब कंपनीत ढवळे यांनी दरमहा ९३ रुपये पगारावर नोकरी पत्करली. मात्र त्यांचा मूळ पिंड स्वत:चा व्यवसाय करणे हाच होता. पगारातून बचत करून ५०० रुपयाच्या भांडवलावर त्यांनी म्हशी खरेदी करून दुधाचा व्यवसाय सुरू केला. दहा वर्ष हा व्यवसाय केल्यानंतर सन १९८१च्या गुढी पाडव्याला सायकलच्या दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. सायकल दुरुस्तीचे कोणतेही प्रशिक्षण न घेता केवळ निरिक्षण आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी हे कौशल्य आत्मसात केले. हा व्यवसाय चांगला चालला. त्याच्या बळावरच ढवळे यांनी स्वत:चे घर बांधले. दुचाकी दुरुस्तीचे कौशल्य प्राप्त केले. याच व्यवसायातून त्यांनी अडीच एकर जमीन खरेदी केली. त्यावर शेती केली. मंडपाचा व्यवसाय केला. ट्रक आणि जीपद्वारे माल वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला. फियाट कारमधून पुणे ते अहमदनगर प्रवासी वाहतूक केली. सन २००२ पासून त्यांनी उरुळी कांचन परिसरातील मोगा-याची पुणे मार्केट यार्डपर्यंत वाहतूक सुरू केली. हा व्यवसायही चांगला चालला. त्यातून घराजवळ ३० गुंठे जमीन खरेदी करून त्यावर फुले आणि भाजी पाल्याची शेती सुरू केली.

मात्र या छोट्या शेताची नांगरट करताना बैल पूर्ण क्षमतेने काम करू सशक्त नाहीत. जमिनीच्या तुकड्याचा दोन्ही बाजूचा पट्टा रिकामाच राहतो, अशी अडचण पुढे आली. त्यातून त्यांनी हाताने चालविण्याचे कोळपणी यंत्र आणले. त्यावर काम करताना त्यांच्यातील तंत्रज्ञ जागा झाला. त्यांनी या यंत्राला सुरुवातीला एम- ८०, नंतर राजदूत मोटारसायकल, पेगोचे इंजिन बसवून छोटा यांत्रिक नांगर तयार केला. त्याच्या आकारमानाप्रमाणे विविध प्रकारची चाके आणि टायर या यंत्राला जोडले. या यंत्राची वाहतूक सुलभ करण्यासाठी मागची नांगर आणि इतर अवजारे प्रवासाच्या वेळी वर उचलत यावी यासाठी जुन्या बाजारातून रिडक्शन गिअर आणून तो या यंत्राला जोडला आणि हायड्रोलिक यंत्रणेला सुलभ आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध केला.
त्यांच्या या उपयुक्त संशोधनाचा व्यावसायिक वापर करण्यात ढवळे यांना फारसा रस नाही. मात्र हे संशोधन छोट्या शेतक-यांना उपयुक्त ठरावे आणि त्यांचे शेतातील काम सुलभ ठरावे; अशी मात्र त्यांची प्रामाणिक तळमळ आहे.

Leave a Comment