
पुणे – नेपाळमधील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातून नेपाळ व उत्तर भारतात गेलेले १५९ नागरीक सुखरुप असल्याची माहिती वेगवेगळया यात्रा कंपन्यांतर्फे देण्यात आली आहे. तसेच काही गिर्यारोहक आणि नेपाळला गेलेले पुण्यातील नागरिकही सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.
पुण्यातील १५९ नागरीक सुरक्षित, यात्रा कंपनींची माहिती
केसरी ट्रॅव्हल्सचे ८४ पर्यटकांना मुंबई ते काठमांडू घेऊन जाणारे विमान लखनौ येथे इमर्जन्सी लॅंडीग करुन पुन्हा पुण्याला आणले जाणार असल्याची माहिती केसरी ट्रव्हल्सतर्फे देण्यात आली. तर चौधरी यात्रा कंपनीचे ४५ व्यक्ती देखील वाराणसी येथे सुखरुप असल्याची माहिती चौधरी यात्रा कंपनीतर्फे प्रसिध्द करण्यात आली. नेपाळसह राजधानी दिल्ली व संपूर्ण उत्तर भारताला शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या भूकंपात नेपाळमध्ये मोठी जिवितहानी झाली आहे. त्यामुळे नेपाळ व उत्तर भारतात गेलेले पुणे शहरातील प्रवासी सुखरुप असल्याची माहिती यात्रा कंपन्यांच्या कार्यालयांकडून संबंधितांच्या नातेवाईकांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील राहुल पाटील, सुनिता पाटील, नितीक पाटील, सुरेशचंद्र चौपडा आणि श्रीमती चौपडा हे ५ व्यक्ती पोलीस हेडकॅटर काठमांडू येथे सुरक्षित असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. तर राज्यातून ऐवरेस्ट सर करण्यासठी गेलेले गिर्यारोहक किशोर धनकुडे (पुणे) आणि रफिक शेख (औरंगाबाद) हे दोघेही नेपाळमधील गोरक्षेप येथे सुखरुप असल्याची माहिती नेपाळमधील भारतीय दुतावासातर्फे देण्यात आली. नेपाळ मधील भारतीय दुतावासाने ९७७९८५११०७०२१ ही हेल्पलाईन सुरू केली आहे. तसेच पुण्याचे खासदार अनिल शिरोळे नेपाळ आणि उत्तर भारतात गेलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत असून परराष्ट्र खात्याशी संपर्क ठेऊन आहेत.
