दर तासाला ५० बालकांचा होतो आहे मलेरियामुळे मृत्यू

unisef
नवी दिल्ली : जगभरातील मलेरियाबाबत अतिशय धक्कादायक माहिती संयुक्त राष्ट्र बाल कोष (यूनीसेफ) या संघटनेने समोर आणली असून दररोज १ हजार २०० चिमुकल्यांचा जगभरात मृत्यू होतो, अशी माहिती यूनीसेफने दिली. जागतिक मलेरिया दिनाच्या आधी ‘फॅक्ट्स अबाऊट मलेरिया अँड चिल्ड्रन’ नावाचा अहवाल संयुक्त राष्ट्र एजेंसीने जारी केला.

शिन्हुआ या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मलेरियामुळे पाच लाख चिमुरड्यांचा मृत्यू होणे ही अतिशय दु:खद आहे. शिवाय दिवसेंदिवस मलेरिया आपल्यासमोर आव्हान उभे करते आहे, अशी यूनीसेफचे सहाय्यक निर्देशक मिकी चोपडा यांनी चिंता व्यक्त केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मलेरियामुळे २०१३ मध्ये जगात ५ लाख ८४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील ९० टक्के मृत्यू हे अफ्रिकन देशांमध्ये झाल्याचे समोर आल्यामुळे मलेरियाबाबत जागतिक स्तरावर प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे.