शुद्धता जाणून घेण्यासाठी आता सोन्याचाही एक्सरे

gold
सोने खरेदी करताना सर्वसामान्य लोकांना आपण खरेदी करतोय ते सोने म्हणजे वळी, नाणी, दागिने नक्की किती शुद्ध आहेत याची धास्ती मनात असते. त्यासाठीच आता खरेदी केले जात असलेले सोने किती शुद्ध आहे हे पाच मिनिटांच्या अवधीत सांगू शकणारे विशेष एक्स रे मशीन नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कन्झर्व्हेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी, लखनौ येथील वैज्ञानिकांनी तयार केले आहे. हे एकप्रकारचे मायक्रो एक्सरे मशीन आहे. यामुळे सोन्याची शुद्धता त्वरीत समजू शकेल असा वैज्ञानिकांचा दावा आहे.

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे मशीन मेट्रो स्टेशनवरील स्कॅनरसारखेच काम करते. यात असलेल्या ट्रे मध्ये सोन्याची नाणी, दागिने अथवा अन्य वस्तू टाकल्या तर एक प्रकाशशलाका येते. म्हणजे या सोन्याचे स्कॅनिंग केले जाते आणि कांही मिनिटात सोने शुद्धतेचा रिपोर्ट मिळतो. बँकांना सोने गहाण घेताना सोने शुद्धता तपासणीसाठी अधिकृत सोनारांकडे जावे लागते व त्यानंतरच सोन्यावरचे कर्ज मिळते यात बराच वेळ जातो. त्यांनाही हे मशीन अतिशय उपयुक्त ठरणार आहे. बरेचदा सोने खरेदी करताना ज्वेलर्स फसवणूक करतात म्हणजे २२ कॅरेट सांगून प्रत्यक्षात १८ किवा त्याहून कमी कॅरेटचे सोने देतात. ही फसवणूक कळणे ग्राहकांना अवघड असते त्यांनाही या मशीनचा उपयोग होऊ शकणार आहे.

अर्थात सध्या या मशीनची किंमत ४५ लाख रूपये आहे. त्यामुळे ही मशीन बसविण्याची केंद्रे सुरू करून तेथून कांही ठराविक रककम आकारून सोने तपासून देणे शक्य होईल असेही संशोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment