अजमेर दर्गा प्रसाद लिलाव – ३ वर्षांची प्रतीक्षा यादी

kadhai
अजमेरच्या मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याचा उरूस सोमवारपासून सुरू झाला आहे. ८०३ वर्षे ही परंपरा सुरू असून या उरूसात एकाचवेळी ६ हजार जणांचे जेवण बनू शकेल अशा दोन महाप्रचंड कढयातून प्रसाद केला जातो. विशेष म्हणजे भाविक स्वखर्चानेही प्रसाद बनवू शकतात मात्र त्यासाठी सध्या तीन वर्षांची प्रतीक्षायादी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसाद बनविण्यासाठीचे लिलाव पुकारले जातात आणि त्याला कोट्यावधी रूपयांच्या बोली लागतात. रोज अनेक पदार्थ या अजस्त्र कढयांतून बनविले जातात आणि भाविकांना प्रसाद म्हणून वाटले जातात. जे दर्ग्याकडे मन्नत मागतात, ते ती पुरी झाल्यानंतर प्रसाद बनवून त्याचे वाटप करतात. प्रसादाच्या लिलावातून जो पैसा जमा होतो त्यातून वर्षभर मोफत लंगर चालविले जातात आणि मुलांच्या शिक्षणासाठीही त्यातूनच खर्च केला जातो.

विशेष म्हणजे येथे बनणारा प्रसाद पूर्ण शाकाहारी असतो. तांदूळ, मैदा, गूळ, तूप, साखर, सुकामेवा,हळद असे पदार्थ वापरूनच तो बनविला जातो. त्यासाठी दोन मोठ्या कढया वापरल्या जातात. मोठी कढई बादशहा अकबर याने भेट दिलेली आहे तर छोटी कढई बादशहा जहांगीरने भेट दिलेली आहे. मोठ्या कढईत एकावेळी ४८०० किलोचा प्रसाद बनतो तर छोट्या कढईत २२४० किलोचा प्रसाद एकावेळी बनविता येतो. म्हणजे एकावेळी ६ हजार लोकांना जेवण मिळेल इतका प्रसाद या कढयांतून बनतो.

उरूसाव्यतिरिक्त कुणाला प्रसाद करायचा असेल तर छोटया कढईतील प्रसादासाठी ६० ते ७५ हजार रूपये तर मोठ्या कढईतील प्रसादासाठी साधारण सव्वा ते दीड लाख रूपये खर्च येतो असे समजते.

Leave a Comment