खास दिवसाची स्पेशल भेट

gift
आपल्या जवळचे कुटुंबिय, नातेवाईक, मित्र यांना त्यांच्या वाढदिवस अथवा अन्य महत्त्वाच्या दिवशी काय भेट द्यावी याचा प्रश्न पडत असेल तर किशोर कटारिया या रियल इस्टेट मधील व्यावसायिकाकडे त्याचे उत्तर मिळू शकेल. किशोर कटारिया यांनी आता प्रोफेशन म्हणूनही या खास भेटीचा व्यवसाय सुरू केला आहे आणि ही खास भेट आहे चलनी नोटा. अर्थात त्या नेहमीच्या चलनी नोटाच आहेत मात्र त्यावरचे सिरीयल नंबर ज्याला भेट द्यायची त्याचा जन्मदिवस, वाढदिवस अथवा अन्य महत्त्वाच्या तारखेशी जुळणारे आहेत.

किशोर कटारिया सांगतात, त्यांना त्यांच्या मुलीच्या वाढदिवसालाच कांहीतरी खास भेट द्यायची होती तेव्हा ही कल्पना त्यांच्या मित्राने सुचविली. तशी नोट मिळवून कटारियांनी मुलीला दिली तेव्हा तिच्या चेहर्‍यावर फुललेले आश्चर्य आणि आनंद विलक्षण होते. तेव्हापासून त्यांनी हा व्यवसायच सुरू केला आहे. मुंबईचे कमिशनर राकेश मारिया यांनाही कटारिया यांनी ५८ व्या वाढदिवसानिमित्त अशी खास चलनी नोट भेट म्हणून दिली आहे.

अर्थात अशा नोटा मिळविणे सहज सोपे नाही. अनेकदा भलीभक्कम किंमत मोजून त्या मिळवाव्या लागतात तर कधी त्यासाठी नोटांची अख्खी गड्डी घ्यावी लागते व त्यातील एकच नोट आपल्या कामाची असू शकते. अर्थात अशी नोट मिळाली की आपल्या त्या तारखेसंदर्भातल्या आठवणी एकदम ताज्या होऊन जातात आणि संबंधिताला मिळालेला आनंद कशातच मोजता येत नाही असाही कटारिया यांचा अनुभव आहे.

Leave a Comment