इन्स्टाग्रामच्या तत्त्वांमध्ये सुधारणा

instagram
कॅलिफोर्निया : नग्नतेला सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामने विरोध केला असून आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे. मात्र स्तनांच्या शस्त्रक्रियेनंतरच्या छायाचित्रांसह उत्स्फूर्तपणे करण्यात येणा-या स्तनपानाच्या छायाचित्रांना यामधून वगळण्यात आले आहे.

इन्स्टाग्रामने आपल्या संकेतस्थळावर लैंगिक संबंध, गुप्तांग आणि संपूर्ण नग्न छायाचित्रांवर बंदी घातली आहे. मात्र पेंटिंग तसेच शिल्पांमधील नग्नता इन्स्टाग्रामने स्वीकारार्ह मानली आहे. त्यामुळे यापुढे खजुराहोसारख्या ठिकाणांची छायाचित्रे इन्स्टाग्रामवर सहजपणे दिसू शकतील. इन्स्टाग्रामने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केलेल्या सुधारणांमध्ये सोशल मीडियावर खळबळ माजविणा-या छायाचित्रांची कोणतीही शैली स्पष्ट केलेली नाही. अलीकडेच रूपी कौर या टोरँटोमधील ब्लॉगर महिलेने आपल्या ‘पीरियड’ नावाच्या छायाचित्रांच्या मालिकेमध्ये महिलेच्या मासिक पाळी दरम्यानची अवस्था दाखविणारी छायाचित्रे इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केली होती. त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करीत असल्याने इन्स्टाग्रामने ती छायाचित्रे हटविली होती. कौरने त्याबाबत टीका केल्यानंतर इन्स्टाग्रामने नंतर तिची माफी मागितली होती तसेच तिच्या छायाचित्रांनाही परवानगी दिली होती.

Leave a Comment