नासाच्या अभ्यासातील नवा निष्कर्ष; ४४७ अब्ज वर्षे आहे चंद्राचे वय !

moon
वॉशिंग्टन – नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने आपल्या सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र असलेल्या चंद्राचे वय शोधून काढले आहे. आपल्याला सर्वांनाच पृथ्वीवरून सहजपणे दिसणारा हा चंद्र ४.४७ अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आला आहे, असे नासाच्या नव्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

चंद्राची निर्मिती पृथ्वी आणि एक महाकाय ग्रह एकमेकांवर आदळल्यानंतर त्यातून झाली असल्याचा निष्कर्षही या अभ्यासातून निघाला आहे. तथापि, हे दोन्ही ग्रह एकमेकांवर आदळण्याची नेमकी वेळ अद्याप निश्‍चित होऊ शकली नाही. अपोलो ऍस्ट्रॉनॉटकडून चंद्राबाबत प्राचीन काळापासून जे पुरावे प्राप्त झाले आहेत, त्यांचा अजूनही अभ्यास सुरू असल्याचे नासातील एका वरिष्ठ वैज्ञानिकाने म्हटले आहे.

या अभ्यासात असे आढळून आले की, या दोन महाकाय ग्रहांची टक्कर झाल्यानंतर असंख्य किलोमीटर आकाराचा आणि अतिशय वेग असलेला एक तुकडा बाहेर पडला आणि पृथ्वीच्या भूपृष्ठावर आदळून अंतराळात गेला. ज्या ठिकाणी हा तुकडा आदळला होता, त्याचा परिणाम अजूनही पृथ्वीवर कायम आहे. या जागेचा अभ्यास करण्यात येत असून, प्राथमिक अभ्यासातून चंद्र ४.४७ अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आपल्या भौगोलिक वातावरणात जी सर्वात अलीकडील सौरमालिका पाहायला मिळत आहे, ती दहा कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आली असल्याचेही या अभ्यासात दिसून आले आहे.

Leave a Comment