३ महिन्यांत १० किल्ल्यांच्या दुरुस्तीचा कृतिआराखडा

vinod-tawade
मुंबई : सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा दहा किल्ल्यांच्या दुरुस्तीबाबतचा कृतिआराखडा प्रायोगिक स्वरूपात ३ महिन्यांत तयार करावा, असे निर्देश दिले.

तावडे यांच्या दालनात राज्यातील गड व किल्ले यांचे जतन व संवर्धन करण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीची पहिली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या सूचना त्यांनी समितीला केल्या.

तावडे म्हणाले की, राज्यात सुमारे ३१७ किल्ले आहेत या किल्ल्यांपैकी ४७ किल्ले राष्ट्रीय संरक्षित असून ते केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहेत व ४९ किल्ले राज्य संरक्षित असून ते महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाच्या अखत्यारित आहेत. या किल्ल्यांचे जतन, दुरुस्ती व संवर्धनाची कामे योग्य रीतीने व्हावीत यासाठी ती टप्प्याटप्प्यांनी करणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी राज्यातील किल्ल्यांबाबतचे स्वतंत्र गॅझेट काढणे, दुर्गप्रेमींचे संमेलन भरवणे, सोयीनुसार जिल्हानिहाय समित्या नेमणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. ही समिती महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे मूळ स्वरूपात जतन करणे, त्याचे ऐतिहासिक महत्त्व कायम राखणे, या किल्ल्यांची दुरुस्ती, संरक्षण-संवर्धन व देखभाल करण्यासाठी काम करणार आहे.सांस्कृतिक कार्यमंत्री श्री.तावडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर व पांडुरंग बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच समितीमध्ये ॠषिकेश यादव, राजेंद्र टिपरे, राजेंद्र शेळके, प्रमोद पाटील, भगवान चिले, वी.रा.पाटील, प्र.के.घाणेकर, संकेत कुलकर्णी यांचा समावेश आहे.

Leave a Comment