नेताजींच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार?

netaji
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू नक्की कसा व कशामुळे झाला यामागच्या रहस्यावर गेली अनेक वर्षे पडलेला पडदा दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेताजींच्या मृत्यसंदर्भातल्या सर्व गुपित फायली सार्वजनिक कराव्यात अशी मागणी नेताजींचे पणतू सूर्यकुमार बोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बर्लिन भेटीत केली होती व त्यावर विचार करण्याचे आश्वासन मोदींनी दिले आहे. त्यामुळे नेताजींच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विदेश दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधानांची सूर्यकुमार बोस यांनी बर्लिन येथे भेट घेतली होती. सूर्यकुमार यांच्या म्हणण्यानुसार नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचे सांगितले जात असले तरी अनेकांना त्याबाबत शंका आहे. तसेच जवाहरलालांच्या काळात नेताजींच्या कुटुंबियांवर दोन दशके सतत नजर ठेवली गेल्याचे प्रकरण ही त्यांनी चर्चेत आणले आणि त्यासदर्भात तपास आयोग नेमण्याची विनंती मोदींना केली त्यावरही विचार करण्याचे आश्वसन मोदींनी दिले असल्याचे समजते.

सूर्यकुमार म्हणाले की नेताजींच्या मृत्यूचे नेमके कारण व त्यामागचे सत्य समोर यायला हवे अशी मोदींचीही इच्छा आहे. नेताजींच्या मृत्यूचे गूढ उकलणे ही केवळ त्यांच्या कुटुंबियांची इच्छा नाही. नेताजी देशाचे नेते होते व त्यामुळे ही सर्व भारत वासियांची इच्छा आहे. या संदर्भात पूर्वी नेमले गेलेले दोन्ही आयोग केवळ नामधारी होते असाही आरोप सूर्यकुमार यांनी केला आहे. ते म्हणाले मुखर्जी आयोगाने चांगली कामगिरी केली मात्र त्यांना तपासाचे अधिकारच दिले गेले नव्हते.

Leave a Comment