लग्नात आठ फेरे घ्या, सरकारची आर्थिक मदत मिळवा

fera
हरियाणा सरकारने लग्नात सात फेर्‍यांबरोबरच जे वधूवर आठवा फेरा घेतील त्यांना आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे. हा आठवा फेरा म्हणजे बालिका भ्रूण हत्या न करण्याची आणि महिलांना योग्य मान व संरक्षण देण्याची शपथ आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल यांनी रविवारी पंचकुला मध्ये फोरम फॉर अवेअरनेस ऑफ नॅशनल सिक्युरिटी सेमिनार मध्ये बोलताना ही घोषणा केली. अर्थात सरकार असा आठवा फेरा घेणार्‍यांना किती आर्थिक मदत देऊ करणार आहे याची माहिती मिळू शकलेली नाही.

हरियानात स्त्री पुरूष प्रमाणाचा रेशो देशात सर्वात कमी आहे. हा रेशो सुधारावा यासाठी सरकारकडून सातत्याने उपाय योजना केली जात आहे.गर्भातच मुलीची हत्या करण्याचे प्रमाणही हरियाणात अधिक असून तेथील सरकारपुढे ते आव्हान आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही घोषणा हा चांगला प्रयत्न असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. समाजाने ही बाब गंभीरपणे घेतली तर त्यांचे चांगले परिणाम लवकरच दिसतील असेही सांगितले जात आहे. यापूर्वी सरकारने गरीब परिवारातील पहिल्या मुलीसाठी २१ हजार रू. ठेवीची योजना राबविली असून ही मुलगी १८ वर्षांची झाली की तिला १ लाख रूपये दिले जाणार आहे. दोन मुलींपर्यंत ही योजना लागू असून अनुसुचित जाती जमातींसाठी ही सवलत तीन मुलींपर्यंत आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेची सुरवात हरियानातूनच केली होती.

Leave a Comment