येथे आपोआप धावतात रेल्वेचे डबे

badmer
राजस्थानातील बाडमेर हे असे रेल्वे स्थानक आहे जेथे आपोआपच रेल्वेची इंजिने आणि डबे धावतात. उभ्या असलेल्या रेल्वे सुरू नसताना कधी धावतील हे सांगता येत नसल्याने येथे रेल्वेचे डबे आणि इंजिने भक्कम लोखंडी साखळ्यानी बांधून ठेवली जातात तसेच रूळावर चाकांच्या फटीतून लाकडी ओंडकेही बसविले जातात.

तुम्हाला हा कांही भुताटकीचा प्रकार आहे असे वाटत नसेल तर मात्र ते चुकीचे आहे. बाडमेरपासून जोधपूरकडे जाणार्‍या रेल्वेरूळांत जिप्सम हॉल्टपर्यंत प्रचंड उतार आहे. यामुळे हे घडते. आत्तापर्यंत तीन चार वेळा अशा घटना घडल्याही आहेत. हलकासा धक्का बसला किवा कांहीवेळा आपोआपच डबे धावत सुटले आहेत. हा स्पीड साधारण ६० ते ८० किमी प्रति तास इतका असतो व त्यामुळे डबे अथवा इंजिन थांबविणही शक्य होत नाही . या मार्गावर पाच रेल्वे फाटके असून त्यातील दोन बंद केली गेली आहेत. जिप्सम हॉल्टपाशी पुन्हा चढ सुरू होतो त्यामुळे तेथे जाऊन हे धावणारे डबे अथवा इंजिने आपोआपच थांबतात.

मिळालेल्या माहितीनुसार २०११ साली रात्री ११ च्या सुमारास असेच रेल्वे इंजिन रूळांवरून धावले आणि जिप्सम हॉल्टपाशी जाऊन थांबले, सुदैवाने यावेळी रूळांवरून दुसरी गाडी येत नव्हती त्यामुळे मोठा अपघात टळला. २०१३ साली गुवाहाटी एक्स्प्रेसचे १३ डबे असेच आपोआप घसरू लागले. रेल्वेची सुटण्याची वेळ रात्री ११ ची असताना ९ वाजताच डबे धावू लागले. त्यावेळी समोरून येणारी दुसरी ट्रेन उत्तरलाई स्थानकावर थांबविली गेल्याने अपघात टळला. २५ जानेवरी २०१५ रोजी शंटिंग सुरू असताना यशवंतपुरम एक्स्प्रेसचा डबा असाच सुसाट सुटला. त्यावेळी मार्गावरची तिन्ही फाटके उघडीच होती. मात्र लोकांनीच समजूतदारपणा दाखवून डब्याला वाट करून दिल्याने अपघात झाला नाही.

Leave a Comment