वॉशिंग्टन – अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी अवघ्या एका मिनिटातच बॅटरी पूर्णपणे चार्ज करणारी ऍल्युमिनियम बॅटरी विकसित केली आहे. शिवाय, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल, इतकी कमी या बॅटरीची किंमत असल्यामुळे आता मोबाईल किंवा स्मार्टफोनची बॅटरी चार्ज करण्यासाठी आता तासन्तास अडकून बसावे लागणार नाही.
मोबाईलची बॅटरी करा एका मिनिटात चार्ज
स्मार्टफोनचा वापर करणार्यांना मोबाईलपेक्षाही चार्जिंगच्या त्रासाचा फार जास्त सामना करावा लागतो. अशा फोनमधील बॅटरी लवकरच संपते. अशा फोनसाठी इतर प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलेली ऍल्युमिनियमची बॅटरी वारंवार चार्जिंग केल्यानंतरही लवकरच संपत असल्याचे आढळून आले होते. मात्र स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी ही बॅटरी ७५०० पेक्षा अधिक चार्ज करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. आगीचा धोका नसल्याने सध्याच्या लिथियम आणि अल्कलाईनच्या बॅटरीपेक्षा ही बॅटरी अधिक सुरक्षित असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
याबाबत बोलताना स्टॅनफोर्ड विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक होन्जी दाय म्हणाले की, आम्ही एका मिनिटात मोबाईलची बॅटरी चार्ज करणार्या ऍल्युमिनियमच्या बॅटरीचा शोध लावला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या बॅटरी पर्यावरणासाठी धोकादायक आहेत. आमच्या नव्या बॅटरीला तुम्ही छिद्र पाडले, तरी आग लागणार नाही. या ऍल्युमिनियम बॅटरीची किंमत कमी असल्याने ती वापरण्याकडे लोकांचा कल वाढत आहे.