मोदींच्या मतदारसंघात इच्छाधारी नागाचे लग्न

nagin
वाराणसी- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला विज्ञानाची कास धरा आणि देशाचा विकास करा असे वारंवार सांगत असताना त्यांच्याच मतदारसंघात अंधश्रद्धा किती खोलवर रूतली आहे याची प्रचिती देणारी घटना घडली आहे. इच्छाधारी नाग आणि नागिणीचे लग्न होत असल्याची अफवा या परिसरात पसरताच अक्षरशः हजारोंच्या संख्येने येथे जमलेल्या गर्दीला पांगविण्यासाठी अलाहाबाद, चंदोली, सोनभद्र अशा पाच पोलिस ठाण्यातील पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार वाराणसीपासून ३० किमीवर असलेल्या राजपूर गांवात शिवमंदिरात शनिवारी इच्छाधारी नाग आणि नागिणीचा विवाह होत असल्याची अफवा पसरली. त्यामुळे पहाटेपासून या ठिकाणी दूरदूरवरून येऊन लोकांनी गर्दी केली. दिवस उजाडताना इतकी गर्दी झाली की अखेर पोलिसांना गर्दी पांगविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. इच्छाधारी नाग म्हणवून घेणार्‍या संदीप पटेल या युवकाला आणि त्याच्या वडीलांना पोलिसांनी नजरकैद केले व गर्दी पांगविली.

संदिप याला अर्धांग वायू झाला आहे. त्यामुळे तो सापासारखा सरपटत चालतो. त्यातूनच त्याने आपण इच्छाधारी नाग असल्याचे आणि इच्छाधारी नागिणीशी विवाह करत असल्याचे पिल्लू सोडले. ही अफवा अतिवेगाने आसपासच्या परिसरात पसरली. आणि पाहता पाहता शिवाच्या साक्षीने होणारा हा विवाहसोहळा पाहायला प्रचंड गर्दी जमली. अखरे पोलिसांना त्यात हस्तक्षेप करावा लागला.

Loading RSS Feed

Leave a Comment