विविध अॅप्सच्या मदतीने संघ होतोय स्मार्ट

rss
खाकी हाफपँट, हातात लाठी आणि डोक्यावर काळी टोपी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची परंपरागत ओळख असली तरी आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संघाने कात टाकणे सुरू केले आहे. आपली परंपरागत ओळख कायम राखतानाच संघाच्या शाखेत स्वयंसेवकांना शारिरीक कवायतींबरोबरच मोबाईल अॅप्सच्या सहाय्याने ज्ञानामृत पाजण्याचे कामही केले जात आहे. अलिकडेच संघाने त्यांची सहाहून अधिक अॅप्स लाँच केली असून जनसंपर्काचा वेग वाढविला असल्याचे दिसून येत आहे.

संघाने लाँच केलेल्या अॅपमध्ये आरएसएस मोबाईल, श्री गुरूजी, अमृतवचन, स्मरणीयम, वंदना, प्रेरणा सुमन, अर्चना ही मुख्य आहेत.स्मार्टफोन तंत्रज्ञान क्रांतीलाच संघाने जनसंपर्काचे माध्यम बनविले असून युवा वर्गावर पकड जमविली आहे. राष्ट्रवादाचे बाळकडू पाजण्यासाठी या अॅपचा सहारा घेतला जात आहे. प्रेरणासुमनमध्ये महान व्यक्ती, हेगडेवार यांच्यासह सर्व सरसंघचालक, स्वातंत्र्यसेनानी, महापुरूष यांच्यासंबंधीची सर्व माहिती दिली गेली आहे. आरएसएस मोबाईल द्वारा संघाच्या शाखांचे लोकेशन समजते. अमृतवचन हिंदुत्वाविषयी सांगते तर वंदना मंत्र व त्यांचा अनुवाद सांगते. स्मरणीयम मध्ये दोहे आणि श्लोक आहेत तर अर्चना अॅप मध्ये शाखेत गायिली जाणारी गीते आहेत. विशेष म्हणजे युवा वर्गात ही अॅप खूपच लोकप्रिय होत असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment