पाच चंद्र-सूर्य ग्रहण होणार वर्षभरात!

grahan
मुंबई : एकूण पाच ग्रहणे गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या नवीन वर्षात होणार असून, यात ३ चंद्र, तर २ सूर्यग्रहणे आहेत. महाराष्ट्रीय पंचांगात दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबरला होणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही तसेच २३ मार्च रोजीचे चंद्रग्रहण मांद्य असल्याने त्याचे वेध पाळण्याची गरज नाही. याशिवाय ४ एप्रिल आणि २८ सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण तर ९ मार्च रोजी सूर्यग्रहण होणार आहे.

या वर्षातील पहिले ग्रहण हनुमान जयंतीला आहे. हे चंद्रग्रहण महाराष्ट्रात खंडग्रास दिसणार आहे. महाराष्ट्रातील बहुतांश गावांमध्ये ग्रहण लागलेल्याच चंद्राचा उदय होईल. हनुमान जयंतीला सूर्योदयापासूनच ग्रहणाचे वेध असले तरी हनुमान जन्मोत्सव, पुजा करावी, प्रसाद ग्रहण करावा. यापूर्वी २४ एप्रिल १९८६ रोजी हनुमान जयंतीला ग्रहण योग आला होता. यानंतर १३ सप्टेंबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण आहे. मात्र ते भारतातून दिसणार नाही. २८ सप्टेंबरचे खंडग्रास चंद्रग्रहण महाराष्ट्रातून दिसणार नसले तरी गुजरात व राजस्थानच्या काही भागात दिसणार आहे. जामनगर, जुनागड, भुज, द्वारका, जेसलमेर येथे या ग्रहणाचा फक्त स्पर्श दिसेल. ज्या भागात ग्रहण दिसेल त्याच भागात वेध पाळायचे असल्याने महाराष्ट्रात वेध पाळण्याची गरज नाही. २०१६ मध्ये ९ मार्च रोजी खंडग्रास सूर्यग्रहण आहे. मात्र सुमात्रा, इंडोनेशिया, उत्तर पॅसिफिक महासागर येथून हे ग्रहण खग्रास दिसेल. भारतात ग्रहणस्पर्श सूर्योदयाच्यापूर्वीच होईल व थोड्याच वेळात ग्रहण मोक्ष होईल. विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर येथे हे ग्रहण दिसणार आहे. भंडारा येथे सर्वाधिक म्हणजे २२ मिनिटे, तर अकोला येथे सर्वात कमी म्हणजे १० मिनिटे ग्रहण पाहता येईल. भंडारा येथे सकाळी ६.२६ वाजता सूर्योदय होईल आणि ६.४८ वाजता ग्रहण मोक्ष होईल. अकोला येथे सूर्याेदय ६.३७, तर मोक्ष ६.४७ वाजता आहे. या वर्षातील अखेरचे ग्रहण २३ मार्च रोजीचे चंद्रग्रहण आहे. मात्र ते मांद्य असल्याने त्याचे वेध पाळण्याची गरज नाही. नेहमीच्या चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या दाट छायेत आल्याने तो काळसर तपकिरी दिसतो, तर मांद्य किंवा छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र कमी तेजस्वी दिसतो.

Leave a Comment