आणखी एका भाजप खासदाराचे संशोधन, बीडी, तंबाखुमुळे होत नाही कुठलाही रोग

gupta
अलाहाबाद – खासदार दिलीप गांधी यांनी नुकतेच भारतात तंबाखुमुळे कर्करोग होतो याचा अभ्यास झालेले नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यासारखेच दुसरे वक्तव्य भाजपच्या आणखी एका खासदारांनी केले आहे.

तंबाखूमुळे कुठलाही आजार होत नसल्याचे बीडी कारखानदार आणि भाजपचे खासदार श्यामचरण गुप्ता यांनी सांगितले असून तंबाखुच्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठीच्या संसदीय समितीचे अध्यक्ष दिलीप गांधी यांच्या पाठोपाठ याच समितीचे सदस्य असलेले गुप्ता यांनी देखील गांधी यांच्याच वक्तव्याची री ओढली आहे.

एक एप्रिलपासून तंबाखूजन्य पदार्थांच्या बाबतीतील वैधानिक सूचना ४० टक्क्यांहून वाढवून ५० टक्के होणार होती. परंतु या समितीने दिलेल्या अहवालानुसार ही मुदत लांबविण्यात आली आहे. श्यामचरण यांचे म्हणणे आहे की जागतिक आरोग्य संघटनानी केलेले अभ्यास खोटे आहेत. बीडीच्या वापरामुळे कर्करोग होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. बीडीचे उत्पादन फक्त भारतात होते त्यामुळे विदेशी शक्ती दबाव टाकून हा उद्योग बंद करू इच्छित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

साखर खाल्ल्याने मधुमेह होतो म्हणून साखर उद्योग बंद करणार का असा सवाल गुप्तांनी केला आहे. श्यामाचरण यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे
अभ्यास फेटाळणे हे त्यांच्या बिडी कारखान्यांच्या हितांचे संरक्षणार्थ आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे. बिडी कारखानदाराला संसदीय समितीच्या सदस्यपदी निवडून भाजपने या विषयाचे गांभीर्यच नष्ट केले असल्याची भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.