विश्वनाथन आनंदचे अवकाशातल्या एका लघुग्रहाला नाव

anand
मुंबई : आंतरराष्ट्रीय अवकाश संघटनेच्या मायनर प्लॅनेट सेंटरचे सदस्य मायकल रुडेन्को यांनी एका लघुग्रहाला भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला आता अधिकृत मान्यता मिळाली असून आता अवकाशातला एक लघुग्रह विश्वनाथन आनंदच्या नावाने ओळखला जाणार आहे.

रुडेन्को हे लघुग्रहांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ असून बुद्धिबळाचेही मोठे चाहते असून त्यांच्याच प्रयत्नांमुळे लघुग्रह क्रमांक ४५३८ आता ‘विशीआनंद’ या नावाने ओळखला जाईल. हा लघुग्रह मंगळ आणि गुरूच्या मधल्या कक्षेत सूर्याभोवती फिरतो.

जपानच्या केन्झो सुझुकी यांनी या लघुग्रहाचा शोध १९८८ साली लावला होता. पण त्याला आजवर नाव मिळाले नव्हते. रुडेन्को यांना नाव सुचवण्याची संधी मिळाली, तेव्हा एखाद्या बुद्धिबळपटूचे नाव या लघुग्रहाला द्यावे, असा विचार रुडेन्को यांनी मांडला आणि आनंदचे नाव सुचवले. आनंदला खगोलशास्त्रातही रस असल्यामुळेच या लघुग्रहाला आनंदचे नाव देण्यात आल्याचे रुडेन्को यांनी स्पष्ट केले आहे.