ब्रिटनच्या विद्यापीठाने नाकारला विदेशी विध्यार्थ्यांना प्रवेश

student
लंडन : ७०० विदेशी विध्यार्थ्यांना आण्विक, जैविक आणि रासायनिक शस्त्रविषयक अभ्यास-क्रमाला ब्रिटनच्या विद्यापीठाने प्रवेश नाकारला असून या विषयाच्या ज्ञानातून विदेशी विद्यार्थी नरसंहारक शस्त्रनिर्मिती करू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आल्याचे प्रसार माध्यमांतील वृत्तात म्हटले आहे.

कट्टरवाद्यांच्या हाती रासायनिक व आण्विक शस्त्रनिर्मितीची माहिती पोहोचू नये यासाठी ७३९ विदेशी विध्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज फेटाळण्यात आल्याचे ‘टेलीग्राफ’ च्या वृत्तात म्हटले आहे. संबंधित विध्यार्थ्यांचे राष्ट्रीयत्व जाहीर करण्यात आले नाही. त्यांना अकॅडमिक टेक्नॉलॉजी अ‍ॅप्रुव्हल स्कीमअंतर्गत कोर्स शिक्षणावर बंदी लादण्यात आली आहे.

संबंधित विषयाच्या शिक्षणातून घातक शस्त्रनिर्मिती होण्याची शक्यता पाहता २००७ मध्ये यूरोपीय संघटनेत अ‍ॅप्रुव्हल स्कीम लागू करण्यात आली. मात्र या निर्णयाला काही खासदारांनी विरोध दर्शविला आहे. ब्रिटिश वंशाच्या नागरिकांवर असे निर्बंध का नाहीत, असा खोचक सवाल त्यांनी केला.