टॅटू काढणार्‍यांना रक्तदान करण्यावर बंदी

tattu
हरियाना- हरियाना सरकारने टॅटू काढून घेणार्‍यांना म्हणजे देशी भाषेत गोंदवून घेणार्‍यांना रक्तदान करण्यास बंदी असल्याचे आदेश जारी केले आहेत. विशेष म्हणजे डॉक्टर्स आणि पॅथॉलॉजिस्टनी या बंदीचे स्वागत करताना देशभरात अशी बंदी घातली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गोंदवून घेतल्यानंतर अनेकदा संसर्ग होण्याचा धोका मोठा असतो. हा संसर्ग लक्षात येण्याचा विंडो पिरीयड किमान ६ महिन्यांचा आहे. यामुळे गोंदवलेल्या माणसाचे रक्त दुसर्‍यांला दिले गेले तर त्यालाही संसर्ग होण्याचा धोका राहतो. गोंदविण्यासाठी ज्या सुया वापरल्या जातात त्यातून हा संसर्ग होऊ शकतो. एकाच सुईने अनेकांना गोंदवले गेले तर त्यातून एचआयव्ही व हेपिटायटीस बी सारखे संसर्ग होऊ शकतात. हा संसर्ग लक्षात येण्यासाठी किमान ६ महिने जावे लागतात. त्यामुळे गोंदवून घेणार्‍यांना किमान १ वर्ष रक्तदानास बंदी परदेशात घातली जाते.

पॅथॉलॉजिस्ट रंजना शर्मा म्हणाल्या अमेरिकन रेड क्रॉस सोसायटी रेग्युलेटरीने गोंदवून घेणार्‍यांना किमान १ वर्ष रक्तदानास बंदी केली आहे. गोंदविताना केवळ सुयाच नव्हे तर त्यासाठी वापरली जाणारी शाईही प्रत्येकासाठी वेगळी वापरली गेली पाहिजे. कारण सुया त्वचेत गेल्यानंतर त्यांचा रक्ताशी संबंध येत असतो व दुसर्‍यांसाठी तीच सुई वापरली तर संसर्गाचा धोका मोठा असतो. भारतात अशा रक्तदात्यांवर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे हरियाना सरकारने घातलेली बंदी अतिशय योग्य असून देशभरात या संदर्भात जनजागृती होणे आणि अशी बंदी घालणे आवश्यक आहे.

Leave a Comment