यमुनोत्रीत दरड कोसळून सूर्यकुंडाचे नुकसान

yamunotri
उत्तराखंडातील चारधाम यात्रेतील एक यमुनोत्री येथे कालिंदी पर्वतातील दरड कोसळून मंदिरातील गरम पाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुंडाचे नुकसान झाले असल्याचे समजते. तसेच यमुनोत्रीला जाणार्‍या मार्गावरच्या जानकीचट्टी रस्त्यावरील भैरव मंदिराजवळही दरड कोसळली असून पायी जाण्याच्या मार्गाचे नुकसान झाले आहे. २००४ साली याच भागात दरडी कोसळून झालेल्या अपघातात ६ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. यमुनोत्रीची यात्रा २१ एप्रिलपासून सुरू होत आहे.

उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी इंदूधर बौडाई यांनी दिलेल्या माहितीनुसार यात्रा सुरू होणार असल्याने या भागात मजुर रस्ता दुरूस्तीचे काम करत होते. तेव्हा अचानक मंदिरामागच्या कालिंदी पहाडातून मोठा आवाज आला आणि दरड कोसळली. ही दरड सूर्यकुंडावर कोसळल्याने कुंडाची पडझड झाली. हे गरम पाण्याचे कुंड असून येथे भाविक पुण्यस्नान करतात. दरडीच्या आवाजाने मजूर पळाले आणि त्यांनी दरड कोसळल्याची खबर दिली. नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी पथक रवाना झाले असून मंदिर सुरक्षेसाठीही उपाय योजले जात आहेत.

Leave a Comment