‘आकाश’ने वाढणार हवाई दलाची ताकद

akash
नवी दिल्ली : पुढील महिन्यात भारतीय लष्कराला आकाश क्षेपणास्त्र मिळण्यास सुरुवात होणार असून आकाश सैन्यदलात दाखल होताच लष्कराला शेजारी देशांच्या शस्त्रांचा सामना करण्यास मदत मिळेल. कारण शेजारी देशांचे हवाई शस्त्रास्त्र आता जुने झाले आहेत. विशेष म्हणजे आकाश क्षेपणास्त्र हे जवळपास ९६ टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेले आहे.

सर्वच ऋतूमध्ये २५ कि.मी.पर्यंत मारक क्षमता असलेले आकाश क्षेपणास्त्र ११ लाख ३० हजार कर्मचारी असलेल्या लष्कराला मिळायला सुरुवात होईल. खरे तर आकाश क्षेपणास्त्र या अगोदरच लष्कराकडे सोपविणे आवश्यक होते. परंतु उशिरा का होईना आकाश हळूहळू लष्कराकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे क्षेपणास्त्र लष्करात दाखल होताच सीमेपलिकडून होणा-या हल्ल्याचा खंबीरपणे सामना करता येणार आहे.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर एप्रिल महिन्याच्या प्रारंभी जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र भारतीय लष्कराकडे सोपवतील. भारतीय लष्कराने प्रारंभी १४ हजार १८० कोटी रुपये खर्चाच्या दोन आकाश रेजिमेंटची ऑर्डर दिली होती. पहिली रेजिमेंट जून-जुलैमध्ये गठित केली जाईल आणि दुस-या रेजिमेंटची स्थापना २०१६ च्या शेवटच्या टप्प्यात करण्यात येईल, असेही सरकारी सूत्रांनी सांगितले. भारतीय हवाई दलाने ६ हजार २०० कोटींची तरतूद करून आकाश क्षेपणास्त्राचे सहा स्क्वाड्रनची मागणी केली आहे. त्यातील दोन ग्वाल्हेर आणि पुण्यात तैनात केले जातील, असेही सांगण्यात आले.

Leave a Comment