मुंग्यांमधील रसायने कर्करोग उपचारात सहाय्यकारी

ants
कर्करोगाचे नियंत्रण करण्यासाठी जे उपचार केले जातात त्यात मुंग्यांमध्ये सापडणारे एकप्रकारचे रसायन खूपच फायदेशीर ठरत असल्याचे नवीन संशोधनात दिसून आले आहे. मुंग्यामधील हे रसायन कर्करोगासाठी वापरल्या जाणार्‍या औषधाची क्षमता ५० टक्कयांपर्यंत वाढविते असे संशोधकांना आढळले आहे. हे संशोधन नेचर कम्युनिकेशन पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आले आहे.

ब्रिटीश वॉरविक विश्वविद्यालयातील प्राध्यापक व संशोधन गटाचे प्रमुख पीटर सँडलर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंग्यामध्ये आढळणारे सोडियम फॉस्फेट हे रसायन कर्करोगासाठी दिल्या जाणार्‍या औषधांची क्षमता खूपच वाढविते असे दिसून आले आहे. हे रसायन विंचू गवत नावाने ओळखल्या जाणार्‍या झाडापासूनही मिळते. कर्करोगाच्या पेशींना जिवंत राहण्यासाठी खूपच गुंतागुंतीची प्रक्रिया आत्मसात करावी लागते. सोडियम फॉस्फेटमुळे ही प्रक्रिया अडथळे आणून बंद पाडली जाते व परिणामी कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात. गर्भाशयाच्या कर्क रोगावरील उपचारात मुंग्यामधील हे रसायन कर्करोगाच्या जेएस ०७ या औषधासह दिले गेले तेव्हा या औषधाची कर्कपेशी मारण्याची क्षमता ५० टक्कयांनी वाढल्याचे दिसून आले.

यावर अधिक संशोधन सुरू असून भविष्यात मुंग्यातील या रसायनाचा फायदा कर्करोगावरील उपचारात नक्कीच घेतला जाईल असा विश्वासही पीटर सँडलर यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment