गुगलने तंत्रज्ञान क्षेत्रात सतत आघाडी राखण्यासाठी सात्यताने नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून अॅंड्राईड स्मार्टफोनसाठी कंपनी असे नवीन फिचर आणत आहे, ज्यामुळे युजरचा स्मार्टफोनचा वापर अधिक सुखद होऊ शकणार आहे. या तंत्रज्ञानामुळे तुमचा स्मार्टफोन तुमचा स्पर्श अनुभवू शकेल आणि स्वतःच लॉक अनलॉक मोड अॅडजस्ट करेल. फोनमधील अॅक्सेलरोमीटरच्या सहाय्याने हे फिचर स्पर्श अनुभवू शकणार आहे.
स्मार्टफोन अनुभवू शकणार स्पर्श
या फिचरमुळे फोन हातात आहे, खिशात आहे की तुमच्यापासून दूर आहे हे फोन स्वतःच ओळखून त्यानुसार लॉक अनलॉक होऊ शकणार आहे. तुम्ही एकदा फोन अनलॉक केला, की जोपर्यंत तो तुमच्या हातात, खिशात आहे तो पर्यंत तो लॉक होणार नाही. मात्र फोन दूर ठेवला असेल तर तो आपोआप लॉक होईल आणि पुन्हा मॅन्युअली अनलॉक करावा लागेल. यामुळे घरी अथवा कार्यालयात फोन विसरला तरी फोनमधील डेटा चोरी होण्याची शक्यता एकदम कमी होईल असा कंपनीचा दावा आहे.
यात एक मेख अशी आहे की तुम्ही तुमचा फोन अनलॉक करून दुसर्याच्या हातात दिला तर तो दुसर्या चा स्पर्श वेगळा ओळखू शकणार नाही. हे फिचर अॅड्राईड ५.० अथवा त्यावरच्या व्हर्जनवरच चालू शकणार आहे.