ताडोबातील हुल्लडबाजी प्रकरणी जिप्सीचालक, गाईड निलंबित

tadoba
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात हुल्लडबाज पर्यटकांची माहिती देण्याऐवजी ती लपवून ठेवणा-या चार जिप्सीचालक व गाईड्ना निलंबित करण्यात आले असून, मध्यरात्री पर्यटकांनी धुडगूस घातल्याची खोटी माहिती समाज माध्यमांतून प्रसारित केल्याबद्दल दोन पर्यटक व ग्रीन प्लॅनेट या वन्यजीव संस्थेवरही कारवाई केली जाणार आहे.

देशातील अग्रगण्य ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघ व बिबट्यांच्या सहज व सुंदर दर्शनामुळे जगभरातील पर्यटकांची गर्दी दिसते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास या प्रकल्पात सुरू असलेली पर्यटकांची घुसखोरी वन्यजीव संरक्षण कायद्याचे सर्रास उल्लंघन आहे, असा आरोप करत ग्रीन प्लॅनेटने वनाधिकारी तसेच पर्यटकांवर कारवाईची मागणी केली होती. यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही तक्रार करण्यात आली. प्रत्यक्षात मध्यरात्री जंगल सफारी झालीच नाही, अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जे. पी. गरड यांनी दिली. समाजमाध्यमांमध्ये देशमुख व पारख नावाच्या पर्यटकाने वाघांची ही चित्रफित टाकली. १ मार्चला पहाटे ६.१२ मिनिटांनी जिप्सी ताडोबा बफर क्षेत्रात पर्यटन करत होती, हे चित्रफितीमधूनच स्पष्ट झाले आहे. फॉरेन्सिक लॅबकडून यासंदर्भातील संपूर्ण माहिती मागविली आहे. ही चित्रफित या दोन्ही पर्यटकांनी टाकल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाईल, तसेच ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे प्रा.सुरेश चोपणे व अन्य सदस्यांनी कुठलीही शाहनिशा न करताना माध्यमांना खोटी माहिती दिल्यामुळे त्यांच्यावरही करवाई करू, असेही गरड यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment