लंडन : खगोलवैज्ञानिकांनी आपल्या आकाशगंगेतून प्रतिसेकंद १२०० कि.मी. वेगाने जाणारा तारा शोधला आहे. हा तारा कुठे चालला आहे हे त्यांनाही माहिती नाही पण त्याचे नाव ‘यूएस ७०८’ असे आहे.
प्रतिसेकंद १२०० कि.मी. वेगाने जाणाऱ्या अतिवेगवान ता-याचा शोध
एवढ्या प्रचंड वेगाने आकाशगंगेत मार्गक्रमण करणारा पदार्थ प्रथमच दिसला असून त्याचा वेग एवढा प्रचंड असण्याचे कारण म्हणजे त्याला गुरुत्वाचे वेसण नाही व त्यामुळेच तो आकाशगंगेबाहेर चालला आहे. यूएस ७०८ हा तारा पहिल्यांदा सौरमालेतील द्वैती ता-याचा एक भाग होता व त्यातील एक श्वेतबटू तारा होता.
श्वेतबटू तारा हा नंतर अण्वौष्णिक नवतारा बनला व त्याचा स्फोट झाला त्यातून यूस ७०८ या ता-याला गती मिळाली व तो अवकाशात सुसाट वेगाने जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय चमूने या ता-याच्या द्वैती स्वरूपावर प्रकाश टाकला असून त्यात अण्वौष्णिक स्फोट होऊ शकतात हे दाखवले आहे. या प्रकारचे नव तारे दीर्घिकांमधील अंतर मोजण्यासाठी वापरले जाऊ शकतात व विश्वाचे बदलते रूप तसेच प्रसार होण्याबाबत माहिती मिळते. हवाई बेटांवरील माऊई येथील माऊंट हालेकाला पॅन स्टार्स१ दुर्बीणीच्या मदतीने हा तारा शोधण्यात आला. गेली ५९ वर्षे या ता-याची माहिती गोळा करण्यात आली.