करोडोंच्या व्यवसाय त्यागून बनणार साधू

bhanvar
सिरोही येथील भंवरलाल डोसी यांनी ३१ मे रोजी जैन साधूची दीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही आमंत्रित करणार असल्याचे सांगितले आहे. डोसी यांचा १ हजार करोड रूपयांचा व्यवसाय असून दरवर्षी या व्यवसायात होणारी उलाढाल ३५० कोटींच्या घरात आहे. त्यांच्या उद्योगाचा अनेक देशी विदेशी कंपन्यांशी टायअप आहे. डोसी यांचे उद्योगजगतात मोठे नांवही आहे.

अहमदाबाद एज्युकेशन ग्राऊंडवर ३१ मे रोजी होत असलेल्या दीक्षा मेळाव्यात आचार्य गुणरत्न सुरि महाराज जैन साधूंची दीक्षा देणार आहेत. त्यात डोसी अन्य ६०० जणांबरोबर ही दीक्षा घेणार आहेत. डोसी म्हणाले की घरदार, व्यवसायाचा त्याग करून मी संयम, शांती, अहिसा आणि सत्य यांचा अंगीकार करून त्यांच्याच आधारे पुढील आयुष्य जगणार आहे. १९८२ साली साध्वी श्रीजी जसवंत यांच्या चातुर्मास कार्यक्रमातच प्रथम वैराग्याची भावना जागृत झाल्याचे डोसी यांचे म्हणणे आहे. मात्र त्यावेळी प्रापंचिक जबाबदार्‍या होत्या, व्यवसायाची जबाबदारीही होती.१९९४ ला परत एकदा सर्वसंग परित्यागाची भावना निर्माण झाली मात्र त्यावेळी पत्नीने परवानगी दिली नाही. आता मात्र दोन्ही मुलांकडे व्यवसायाची धुरा सोपविली आहे. प्रापंचिक जबाबदार्‍या पूर्ण झाल्या आहेत.

३३ वर्षांपूर्वी भंवरलाल यांनी ३० हजार रूपये घेऊन दिल्लीला प्रयाण केले आणि प्लॅस्टीक कच्च्या मालाचा व्यवसाय सुरू केला. हाच व्यवसाय आता १ हजार कोटींचा झाला आहे.

Leave a Comment