महिलांना कंपनी व्यवस्थापनात सक्तीचे आरक्षण

womens
मुंबई : पुरुषांचा कायमच कंपनीच्या व्यवस्थापनात वरचष्मा असतो. महिलांचे प्रमाण या क्षेत्रात अत्यंत कमी असते. महिलांचे प्रमाण या क्षेत्रात वाढण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात किमान एका महिलेला संचालक म्हणून घ्यावे, असे आदेश बाजार नियंत्रक ‘सेबी’ ने सर्व नोंदणीकृत कंपन्यांना दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी येत्या एक एप्रिलपासून करायची आहे. या आदेशाचे पालन न केल्यास कंपनीवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही सेबीने दिला आहे.

देशातील ५०० नोंदणीकृत कंपन्यांच्या संचालक मंडळावर महिलांचे प्रमाण एक तृतीयांशही नाही. सेबीने याबाबत गंभीर दखल घेऊन १६० कंपन्यांना पत्र लिहून महिलांचा संचालक मंडळात समावेश करण्याविषयी रोखठोक पत्र लिहिले. तसेच या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत स्टॉक एक्स्चेंजनाही लक्ष ठेवण्यास सांगितले. तसेच कंपनी व्यवहार खात्याने रजिस्टड्ढार ऑफ कंपनीला संचालक मंडळावर महिलांना पुरेशा प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले आहे का याची खातरजमा करून घेण्यास सांगितले आहे.

इन्स्टिटूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संस्थेलाही त्यांच्या सदस्यांना या नियमाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कारण कंपनी सेक्रेटरी हे कंपनीत महत्वाचे पद भूषवत असतात. तसेच त्यांना कंपनी नोंदणीकृत करण्याबाबतचे नियम माहित असतात. सेबीने फेब्रुवारी २०१४ मध्ये महिलांना व्यवस्थापन मंडळात स्थान देण्यासाठी पावले उचलली. डिसेंबर २०१४ पर्यंत ५०० महिलांचा समावेश संचालक मंडळात झाला.