शिराळशेटाचे राज्य करा ७०० युरो खर्चून

megyar
केवळ एक दिवसाचे राज्य भोगलेल्या शिराळशेटप्रमाणे तुम्हालाही एक दिवसासाठी एखाद्या गावाचे राज्य करायची इच्छा होतेय का? मग त्यासाठी फार कांही करायला नको. केवळ ५० हजार रूपये खर्चायची तयारी आणि हंगेरीची ट्रीप इतकेच पुरेसे होईल. होय ! हंगेरीची राजधानी बुडापेस्टपासून २०० किमीवर असलेले मेग्यर गांव ही अनोखी संधी तुम्हाला देणार आहे.

११ व्या शतकापूर्वीचे हे गांव सध्या वाईट आर्थिक परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे येथल्या महापौरांनी ही अनोखी कल्पना मांडली आहे. महापौर क्रिस्टोफर पेजर यांना या गावाचा कायाकल्प करून त्याला पुन्हा पहिल्यासारखे वैभव प्राप्त करून द्यायचे आहे. त्यासाठी त्यांनी हे गांव भाड्याने देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या गावातील सुमारे ४० जणांची राहण्याची व्यवस्था होऊ शकेल अशी ७ गेस्टहाऊस, ४ रस्ते, १ बसस्टॉप, १ पोल्टी, ६ घोडे, २ म्हशी, १० एकर शेत एक दिवसासाठी ५० हजार रूपये भाडे आकारून तुम्हाला मिळू शकणार आहे. इतकेच नव्हे तर गावाचे उपमहापौरपदही मिळणार आहे. शिवाय गावातील रस्त्यांची नांवे बदलण्याची मुभाही देण्यात येणार आहे. तुमच्यासाठी येथे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमही केले जाणार आहेत.

महापौरांच्या या कल्पनेला अपेक्षेपेक्षाही अधिक प्रतिसाद मिळत आहे असे सांगितले जात आहे. आत्तापर्यंत १ हजारांहून अधिक जणांनी त्यासंदर्भात चौकशी केली आहे तर ४०० जणांनी बुकींगही केले आहे. यातून मिळणारा सारा पैसा गावाच्या विकासासाठी वापरला जाणार आहे.

Leave a Comment