सुंदर पापण्यांसाठी व्यवसाय करून करोडो मिळविणार

eye-lashes
पापण्यांचे लांबसडक दाट केस हे सौदर्यांचे लक्षण मानले जाते. अभिनेत्री, मॉडेल्स यासाठी मुद्दाम खोट्या पापण्या लावून आपले सौदर्यं अधिक उठावदार करतात. मात्र नैसर्गिकरित्याच अशा पापण्या मिळाल्या तर? मग त्यासाठी तुम्हाला युक्रेनमधील वेलरी स्मैगले याची भेट घ्यावी लागेल. तो लांबसडक पापणी केसांसाठीचे रहस्य सांगेल मात्र त्यासाठी तगडी रक्कम तुम्हाला मोजावी लागेल.

युक्रेनच्या किव शहरातील वेलरी स्मैगले याच्या पापण्यांचे केस इतके लांबसडक झाले आहेत की त्याची नोंद आता गिनीज बुकात केली जाणार आहे. विशेष म्हणजे वेलरीच्या पापण्यांचे केस यापूर्वी अगदी मॉर्मल होते मात्र आहारात केलेल्या कांही बदलामुळे हे केस दाट आणि लांबसडक होऊ लागल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने लगेच या गुपिताचा वापर व्यवसायासाठी करून लाखो करोडो रूपये कमविण्याची तयारी सुरू केली आहे.

वेलरी सांगतो, त्याच्या पापण्यांचे केस जेव्हा दाट आणि लांब होऊ लागले तेव्हा अनेक महिलांनी त्याला त्यामागचे कारण विचारले. वेलरीने मात्र हे गुपित फोडले नाही कारण त्याला व्यवसाय करायचा आहे. या गुपिताचा ब्रँड नेम घेऊन तो इच्छुकांसाठी वापर करणार आहे. सध्या त्याचे पापण्यांचे केस खूपच वाढले आहेत. गिनीज बुकमध्ये नोंद केल्यावरच तो ते ट्रीम करणार आहे. अति लांब पापण्यांच्या केसांचे तोटेही आहेत. कांही वेळा डोळे दुखतात, सूज येते आणि इन्फेक्शनचा धोकाही राहतो असेही वेलरी सांगतो. तरीही लांब पापण्यांचे आकर्षण कधीच कमी होणार नाही याची त्याला खात्रीही वाटते.