मृत्यूनंतरची देश सीमा राखणारे हरभजनसिंग यांचे मंदिर

harbhajan
सिक्कीम – एखादा सैनिक मृत्यूनंतरही देशाच्या सीमेचे रक्षण करतोय यावर कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र प्रत्यक्षात याचा अनुभव सिक्कीममधील नथुला खिंडींजवळ असलेल्या हरभजनसिंग मंदिराला भेट दिल्यानंतरच घेता येतो. गेली 45 वर्षे हा सैनिक चीनकडून कांही आगळीक होणार असेल तर येथील सैनिकांना अगोदरच सूचना देतो आहे. मात्र तो अजिबात पार्शालिटी करत नाही. चीनच्या या सीमेवरील सैनिकांनाही तो अशीच सूचना देतो आणि जादा तणाव वाढू नये म्हणून आपसात चर्चेेने प्रश्न सोडविण्यास सांगतो. भारत आणि चीन दोन्ही देशांच्या सैनिकांचे याबाबत अगदी एकमत आहे.

30 ऑगस्ट 1946 साली जन्मलेले हरभजनसिंग भारतीय लष्करात 24 पंजाब रेजिमेंटमध्ये 1968 साली सिक्कीम येथे पोस्टींगवर आले. मात्र नदीतून जात असताना अपघात होऊन ते बसलेल्या खेचरासह वाहून गेले. दोन दिवस त्यांचे प्रेत सापडले नाही तेव्हा त्यांनीच एका सैनिकाच्या स्वप्नात येऊन आपले प्रेत कुठे आहे ते सांगितले. त्यानंतर आजतागायत ते सीमेचे रक्षण करतात यावर सैनिकांचा विश्वास आहे. 1300 फुट उंचीवर ते राहात होते त्या बंकरातच त्यांचे मंदिर उभारले गेले असून आजही येथे येणारे पर्यटक आणि जवान त्यांचे दर्शन घेतातच.

हरभजनसिंग यांचे चमत्कार अजूनही अनुभवास येतात. आजही चीन भारत लष्करातील फ्लॅग मिटींगच्या वेळी हरभजनसिंग यांच्या नावाची मोकळी खुर्ची ठेवली जाते. त्यांचे सामान, फोटो मंदिरात मांडला गेला आहे आणि आजही त्यांना पगार दिला जातो. त्यांची सैनेत एक रँक आहे, नियमानुसार प्रमोशन दिले जाते. असे समजते की पूर्वी त्यांना दोन महिन्यांची सुट्टीही दिली जायची. या काळात तीन सैनिकांसह त्यांचे सामान ट्रेन तिकीट रिझर्व्ह करून त्यांच्या गावी पाठविले जायचे आणि या काळात या सीमेवर लष्करासाठी हाय अॅलर्ट ्रअसायचा. कारण हरभजनसिंग सुट्टीवर असल्यामुळे धोका होणार असेल तर त्याची सूुचना मिळायची नाही.

मात्र नंतर कांही जणांनी न्यायालयात धाव घेऊन हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे आणि लष्करात तरी अंधश्रद्दा नको असा अर्ज केला. तेव्हापासून हरभजनसिंगना सुट्टीवर पाठविले जात नाही. त्यामुळे आता 12 ही महिने ते ड्यूटीवर असतात. आजही त्यांचा बिछाना रोज घातला जातो, त्यांचे बूट पुसून ठेवले जातात. रोज सकाळी बिछाना चादर चुरगळलेली असते आणि बुटांना चिखल लागलेला असतो असे येथील देखभाल करणारे जवान सांगतात. सिक्कीमला गेलात तर हरभजनसिंग मंदिराची भेट चुकवू नका.

येथे तीन दिवस पाण्याच्या बाटल्या भरून त्यावर नावे घालून ठेवतात. हे पाणी औषधी बनते आणि कोणतही रोग त्यामुळे बरे होतात अशीही श्रद्धा आहे. तसेच येथे कागदाच्या चिठ्ठ्या आपली इच्छा लिहून टाकल्या जातात. इच्छा पूर्ण होते असाही अनुभव येतो. या मंदिराची देखभाल लष्कराकडून केली जाते.

Leave a Comment