दशकातील पहिलेच मोठे संशोधन; ९ लघू आकाशगंगेचा शोध

milky-way
वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांना आपल्या आकाशगंगेभोवती परिभ्रमण करणा-या तब्बल नऊ लघू आकाशगंगांचा शोध लागला असून गेल्या दहा वर्षांमध्ये प्रथमच इतका मोठा शोध लागल्याने संशोधकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही माहिती ‘एस्ट्रोफिजिकल जर्नल’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इतक्या आकाशगंगांचा एकाच वेळी शोध लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘मिल्की वे’ भोवती फिरणा-या लार्ज मॅगलेनिक क्लाऊड आणि स्मॉल मॅगलेनिक क्लाऊड या दोन सर्वांत मोठ्या लघू आकाशगंगेजवळच या आकाशगंगांचे अस्तित्व संशोधकांना दिसले. लघू आकाराच्या या आकाशगंगांमध्ये प्रत्येकी साधारण काही अब्ज तारे आहेत. याउलट आपल्या आकाशगंगेत शेकडो अब्ज तारे आहेत. तसेच या लघू आकाशगंगा ‘मिल्की वे’ हून काही अब्जपट अंधूक आणि काही लक्षपट कमी वस्तुमानाच्या आहेत. या नवीन नऊ आकाशगंगांपैकी सर्वांत जवळची आकाशगंगा ही ‘मिल्की वे’ पेक्षा एक लाख प्रकाशवर्षे दूर आहे, तर सर्वांत दूरची आकाशगंगा १० लाख प्रकाशवर्षांपेक्षा दूर आहे.

गेली पाच वर्षे दक्षिणेकडील आकाशात ‘डार्क एनर्जी सव्र्ह’ या संस्थेने दुर्बिणींनी काढलेल्या छायाचित्रांच्या आधारे १२० खगोलशास्त्रज्ञांनी अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. दोन विविध गटांनी या माहितीवर अभ्यास करूनही समान निष्कर्ष आल्याने हा शोध जाहीर करण्यात आला. इतर मोठ्या आकाशगंगांच्या मानाने, या लघू आकाशगंगांमध्ये तारे कमी आणि डार्क मॅटर अधिक प्रमाणात आहे.

Leave a Comment