भिंतीवर मूत्रविसर्जन करणाऱ्यांना घडेल अद्दल

mutra
भिंतीवर मूत्रविसर्जन करण्याची खुमखुमी केवळ भारतीयांनाच आहे असा जर कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. अगदी पुढारलेल्या जर्मनीसारख्या देशातही असा प्रकार करणारे महाभाग आहेतच. मात्र केवळ सूचना आणि इशारे देऊन असे प्रकार थांबत नाहीत हे लक्षात आल्यावर हँबुर्गमधील सेंट पॉली नाईट क्लब परिसरात त्यावर एक नामी शक्कल लढविली आहे. त्या संदर्भात यू ट्यूबवर आलेल्या व्हिडीओला एका दिवसांत तब्बल दोन लाख जणांनी लाईक केले आहे.

या क्लबजवळच्या इमारतींच्या भिंतीवरही मूत्रविसर्जन केले जायचे. त्यामुळे तेथे एक असा हायटेक पेंट वापरला गेला आहे की जो मूत्रविसर्जन करेल त्याच्या अंगावर ते मूत्र परत स्प्रे केल्याप्रमाणे फेकले जाते. सध्या दोन इमारतींच्या भिंतींवर हा पेंट दिला गेला असून त्याला वॉटर रिपेलंट पेंट असेच म्हणतात. त्यावर पाणी पडले की ते परत स्प्रे करून उडविले जाते. या पेंटचा वापर जहाज बांधणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केला जातो.

ही कल्पना प्रत्यक्षात आणणार्‍या ज्युलिया स्टेरॉन सांगतात असा पेंट देण्यामागे दोन हेतू आहेत. त्यामुळे भिंतीचे संरक्षण होतेच पण हा पेंट असले कृत्य करणार्‍यांना तुम्ही चुकीचे काम करत आहात असे बजावतोही. हा पेंट महाग आहे म्हणजे ६५ चौरस फुटाच्या भिंतीसाठी ५०० युरो म्हणजे ३४ हजार रूपये खर्च येतो. पण ज्युलियांच्या मते रोजची सफाई आणि घाण वासापासून मुक्तता लक्षात घेतली तर हा खर्च वायफळ म्हणता येणार नाही.

Leave a Comment