‘आयुका’ ने शोधला सूर्यमालेतील गुरूपेक्षा दहा पटींनी मोठा ग्रह

planet
वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी एक दोन नव्हे तर चक्क चार ता-यांभोवती फिरणा-या महाकाय ग्रहाचा शोध लावला असून मेष राशीतील ३० एरी हा चार ता-यांचा समूह आपल्यापासून १३६ प्रकाश वर्षे दूर असून त्यांच्याभोवती फिरणारा ग्रह आपल्या सूर्यमालेतील गुरूपेक्षा दहा पटींनी मोठा आहे.

भारतासाठी अभिमानाची बाब म्हणजे पुण्यातील ‘आयुका’ ने अमेरिकेतील कॅलटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ च्या मदतीने तयार केलेल्या अ‍ॅडाप्टिव्ह ऑप्टिक्स या यंत्रणेचा वापर या आगळ्या ग्रहाचा शोध लावण्यासाठी करण्यात आला आहे. सॅन दिएगो येथील पॅल्मोअर वेधशाळेतील दुर्बिणीद्वारे या अनोख्या ग्रहाचा शोध लावण्यात आला असून पूर्वी हा ग्रह तीन ता-यांभोवती फिरत असल्याचे मानले जात होते. मात्र अ‍ॅडाप्टिव्ह ऑप्टिक्सचा वापर केल्यावर शास्त्रज्ञांना या समूहाचे अधिक स्पष्टपणे निरीक्षण करता आले. चार ता-यांभोवती फिरणारा अशा प्रकारचा हा केवळ दुसरा ग्रह शास्त्रज्ञांना सापडला आहे. गुरूपेक्षा दहा पटींनी मोठा असणारा हा वायुरूपी ग्रह एका ता-याभोवती ३३५ दिवसांत आपली एक फेरी पूर्ण करतो. त्या ता-याला आणखी एक जोडीदार तारा आहे. हे दोन तारे १६७० खगोलीय एकाकांवर (एक खगोलीय एकक = पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचे अंतर- साधारणपणे १५ कोटी किलोमीटर) असणा-या आणखी एका ता-याच्या जोडीशी गुरुत्वाकर्षणाने बांधलेले आहेत. या ग्रहावरून पाहताना दिवसा आकाशात एक तेजस्वी सूर्य आणि
दोन तेजस्वी तारे दिसू शकतील, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.

मात्र चार ता-यांभोवती फिरणा-या ग्रहावर सजीव सृष्टी निर्माण होणे शक्य नसल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. अशा प्रकारच्या ग्रहावर चार ता-यांचे गुरुत्वाकर्षण कसे कार्य करीत असेल याबाबत शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत.

Leave a Comment