जुनागढ- सौराष्ट्रातील ऐतिहासिक शहर

junagadh
गुजराथच्या संपन्न भागातील जुनागढची ओळख गिरनार पर्वतांच्या पायथ्याशी वसलेली मंदिरांची भूमी म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. जुन्या किल्ल्यावरून या शहराला हे नांव पडले. येथे हडप्पापूर्व काळातील उत्खनन झाले असून या नगरीत ९ व्या शतकातील अनेक मंदिरे आणि मशिदी आहेत. ही मंदिरे आणि मशीदी शहराच्या ऐतिहासिक पणाची साक्ष आजही देत आहेत.

आतिशय वैशिष्ठ्यपूर्ण वास्तुकला, जागोजागी पसरलेल्या हिरवळी, किल्ले. मंदिरे, महाल पर्यटकांना आकर्षित करतात. गिरनार पर्वतावरील हिदू, जैन आणि मुस्लीम धर्मियांची धार्मिक स्थळे पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे भेट देतात.याच रस्त्यावर सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत. यात अशोकाचे राजकीय आदेश, जीवनात अंगिकारायचे नैतिक नियम खडकांवर कोरलेले आहेत. अपरकोट किल्लाही आवर्जून भेट द्यावी असा. असे सांगतात की श्रीकृष्णाशी संबंध असलेले यादव द्वारकेतून येथे आल्यावर त्यांनी हा किल्ला बांधला. त्याचे अवशेष अजूनही चांगल्या स्थितीत आहेत याच किल्ल्यावर नीलम आणि कांडल नावाच्या दोन तोफा आहेत, त्या मात्र इजिप्तमधून आलेल्या आहेत.येथे जवळच बौद्ध गुंफाही आहेत.

येथील सक्करबाग प्राणीउद्यान सर्वात जुने प्राणीउद्यान असून त्याची स्थापना १८६३ साली जुनागढच्या नबाबाने सिंहांच्या संरक्षणासाठी केली असे सांगतात. आज येथे सिह, बिबटे, तरसे असे अनेक वन्य प्राणी आहेत. ५०० एकर परिसरात हे उद्यान पसरले आहे. येथून जवळच गीरचे अभयारण्य असून ते आशियाई सिंहाचे अभयारण्य आहे.

नवघर आणि अडीकाडी या चुडासमा राजपूत राजांनी बांधलेल्या दोन वैशिष्ठपूर्ण विहीरीही पाहायलाच हव्यात अशा.यांची बांधणी वैशिष्ठपूर्ण असून आत उतरण्यासाठी गोलाकार जिने आहेत.जामा मशिद, महाबत मकबर्‍याचे गोल जिने असलेले मिनार, भावनाथ मंदिर येथेही भेट द्यायला हवीच. दामोदर कुंडावर महान संतकवी नरसी मेहता यांना खुद्ध भगवान कृष्णाने फुलांचा हार घातला होता असेही सांगितले जाते. येथे जाण्याचा चांगला मोसम आकटोबर ते मार्च दरम्यानचा आहे. रेल्वे, रस्ते मार्गाने जाता येते तसेच राजकोट विमानतळावर उतरूनही येथे जाता येते.

Leave a Comment