अंतराळ संशोधन केंद्रावर भारताला मिळणार संशोधनाची संधी

space
नवी दिल्ली – भारत आणि अमेरिका अंतराळ संशोधन क्षेत्रात नवीन अध्याय सुरु होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या माध्यमातून भारताला संशोधन करण्याची संधी मिळणार आहे. अमेरिकेचे हत्यार नियंत्रण क्षेत्रातील उपमंत्री फ्रॅंक रोज यांनी याबाबतची माहिती दिली. ते नवी दिल्लीत ऑबझर्वर रिसर्च फाउंडेशनमध्ये या क्षेत्रातील तज्ज्ञांसमोर बोलत होते.

अवकाशातील धोक्यांचा विचार करता भारत अमेरिकेने सहकार्याच्या भूमिकेतून कार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी दोन्ही देशांतील तज्ज्ञांचा विचारविनिमय सुरू आहे. त्यादृष्टीने सर्वंकश धोरण आखण्यासाठी रोज भारतीय तज्ज्ञांबरोबर चर्चा करत आहेत. अवकाश क्षेत्रात मोठी कामगिरी केलेले दोन्ही देश जर हातात हात घालून काम करतील तर त्याचा नक्कीच फायदा होईल असेही ते म्हणाले. भारताच्या सागरी क्षेत्रातील जागरुकतेकरता आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राच्या माध्यमातून अमेरिकेची सहकार्य करण्याची भूमिका आहे. या क्षेत्रात चीन विध्वंसक आणि अडचणी निर्माण करणाऱ्या क्षमता विकसित करत आहे. त्याबद्दल रोज यांनी यावेळी चिंताही व्यक्त केली. चीन सॅटेलाईट विरोधी प्रणाली विकसित करत असताना त्याचे संपूर्ण अवकाश संशोधनालाच धोके आहेत. कारण जर अवकाशात अणूस्फोट घडवून आणला तर त्यातून निर्माण होणाऱ्या किरणोत्सारामुळे संशोधनाला खीळ बसेल. स्पेसवॉक करता येणे शक्य होणार नाही. दुसरीकडे आधीच अवकाशातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या कचऱ्याचा धोका कार्यरत असणाऱ्या उपग्रहांना आहे. चीनच्या सॅटेलाईट विरोधी प्रणालीमुळे अवकाशात कचऱ्याचे ३६,००० धोकादायक तुकडे तरंगत आहेत. त्याचाही बंदोबस्त करणे दिवसेंदिवस निकडीचे होत आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता भारताचा या क्षेत्रातील सहभाग महत्वाचा आहे.

Leave a Comment