डिझेल रेल्वे चालविणारी पहिली भारतीय महिला मुमताझ

mumtaz
मुंबई – स्वप्ने पाहणे आणि अशक्य ते शक्य करून दाखविण्यात भारतीय महिलाही मागे नाहीत याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुमताझ काझी. रूढीप्रिय मुस्लीम घराण्यात जन्माला आलेल्या मुमताझ यांनी १३ वर्षांपूवीच त्यांचे नांव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंदविले ते डिझेल लोकोमोटिव्ह चालविणारी आशियातील पहिली महिला म्हणून. जागतिक महिला दिन ८ मार्चला साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुमताझ यांची ही कहाणी आवर्जून सांगायला हवी.

मुमताझ यांच्या कृतीने अनेक महिलांना आणि तरूणींना आजही प्रेरणा मिळते. मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर डिझेल इंजिनच्या लोकल चालकाच्या सीटवर मुमताझ बसलेल्या दिसतात तेव्हा. ४४ वर्षीय मुमताझ दोन मुलांची आई आहेत आणि आपले आव्हानात्मक काम अतिशय उत्तमपणे पारही पाडत आहेत.

मुमताझ सांगतात, त्यांचे वडील रेल्वेत ट्रक सुपरवायझर आहेत. लोकल ही मुंबईची लाईफलाईन. रेल्वे वसाहतीत राहात असल्याने एकदातरी आपण लोकल चालविली पाहिजे असे त्यांच्या मनाने घेतले. वडीलांच्या तोंडून मोटरमनना पेलावी लागणारी आव्हाने, येणारी संकटे, शारिरीक, मानसिक ताकद याच्या कथा सतत ऐकायला मिळत आणि त्यातूनच १२ वी पास झाल्यानंतर मुमताझनी डिप्लोमा केला. १९८८ ला मोटरमन प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली. त्यावेळी ५० प्रशिक्षणार्थीत त्या एकटीच मुलगी होत्या. कोणत्याही सवलती न घेता हे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले आणि १९९१ ला असिस्टंट ड्रायव्हर म्हणून कामाला सुरवात केली. आशियात डिझेल लोकोमोटिव्ह चालविणार्‍या त्या पहिल्या महिला ठरल्या.

मुमताझ सांगतात केवळ पुरूषांची समजली जाणारी शंटिग, कपलिंग ही कामेही त्या लिलया करतात. या कामात ताण खूप असतो. शारीरिक आणि मानसिकही. मुख्य म्हणजे थोडाही विलंब चालत नाही अन्यथा प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अपघात, पाऊस अशी अनेक आव्हाने असतात. मात्र महिलांना रेल्वेत बाळंतपणाची रजा दिली जाते तशीच मुलांसाठी दोन वर्षे संगोपन रजाही दिली जाते आणि ती मुले १८ वर्षांची होईपर्यंत कधीही घेता येते. या दोन सवलती सोडल्या तर महिला म्हणून अन्य सवलती नाहीत. तरीही त्या सांगतात स्वप्न पहा. अशक्य ते शक्य करण्याची ताकद तुम्हाला आपोआप मिळते.

Leave a Comment