फोर्ब्सच्या यादीत २१ वर्षांत तब्बल १६ वेळा बिल गेट्स अव्वल

bill-gates
न्यूयॉर्क : पुन्हा एकदा फोर्ब्सच्या यादीत जगभरातील श्रीमंतांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी सर्वोच्च स्थान काबीज केले आहे. फोर्ब्स मॅगझिनने या वर्षातील जगातील धनाढ्य व्यक्तींची यादी जाहीर केली आहे.

बिल गेट्स यांनी मेक्सिकोचे उद्योजक कार्लोस स्लिम यांना मागे टाकून पहिला क्रमांक मिळवला. बिल गेट्स यांची एकूण संपत्ती मागील एका वर्षात तीन अब्ज डॉलरने वाढून १३ फेब्रुवारीपर्यंत ७९ अब्ज डॉलर झाली आहे. यामुळे बिल गेट्स यांनी गेल्या २१ वर्षांत तब्बल १६ वेळा फोब्र्जच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. अमरिकेतील गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी फॅशन स्टोअर ‘झारा’ चे संस्थापक अमानशियो ओर्टेगा यांना चौथ्या क्रमांकावर टाकत तिस-या क्रमांकावर स्वत:ची जागा बनविली. बफे यांची एकूण संपत्ती ७२.७ अब्ज डॉलर आहे.

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग या यादीत सोळाव्या क्रमांकावर असून गुगलचे लॅरी पेज आणि सर्गइ ब्रिन अनुक्रमे १९ व्या आणि २० व्या स्थानावर आहे. झुकरबर्ग यांच्याकडे ३३.४ अब्ज डॉलर संपत्ती आहे तर लॅरी पेज आणि सर्गइ ब्रिन यांच्याजवळ २९.७ अब्ज आणि २९.२ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

२२.७ अब्ज डॉलरसह अलीबाबा ई-कामर्स वेबसाईटचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष जॅक मा हे ३३ व्या क्रमांका वर पोहोचले आहेत. शिवाय चीनमधील रियल इस्टेट व्यापारी वांग जिआलिन २९ व्या स्थानावर असून त्यांची संपत्ती २४.२ अब्ज डॉलर संपत्ती आहे.

Leave a Comment