१८ वर्षे पूर्ण होताच मतदार कार्ड घरपोच येणार

voter
दिल्ली- देशातील ज्या तरूणांची आधार कार्डे वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच काढली गेली आहेत, त्यांना १८ वर्षे पूर्ण होताच मतदार कार्ड घरपोच दिले जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यांची नांवे कोणताही अर्ज न करता, अथवा निवडणूक कार्यालयात फेर्‍या न मारताही मतदार यादीत आपोआपच समाविष्ट होणार आहेत. मतदार यादीत नाव येण्यासाठी केवळ आधार कार्डच पुरेसे ठरणार आहे.

निवडणूक आयोगाने आधारकार्डाला मतदार यादी जोडण्याचे काम हाती घेतले असून ते १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यानुसार आधारकार्डावरील फोन नंबर अथवा पत्ता बदल करायचा असेल तर यूआयडीएआयच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करून करता येणार आहे. १५ ऑगस्ट नंतर ज्यांचे आधार कार्ड बनेल ते मतदार यादीशी आपोआपच लिंक होतील आणि त्याचे कन्फरर्मेशन त्यांना दिलेल्या मोबाईल नंबरवर मिळणार आहे.

यासाठी मतदार यादी प्रक्रिया सुलभ केली गेली असून त्यासंदर्भातील सर्व सूचना राज्य निवडणूक आयोगांना दिल्या गेल्या आहेत. त्यासाठी अगोदरच त्यांची मतेही विचारात घेतली गेली होती व त्यांच्या सूचनांप्रमाणे आधार कार्डचा वापर करण्याचा उपाय मान्य करण्यात आला असे समजते.

Leave a Comment