…नाहीतर बहिरेपणाला आमंत्रण

earphone
जीनिव्हा : तरुण पिढीची श्रवणशक्ती मोबाईल किंवा आयपॉडच्या साह्याने संगीत ऐकण्यामुळे धोक्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगातील एक अब्ज तरुण-तरुणींच्या श्रवणशक्तीवर ‘हेडफोन’ ने जोरजोरात संगीत ऐकल्याने परिणाम झाला असल्याचा धक्कादायक निष्कर्ष काढला आहे.
श्रीमंत देशांमधील सर्वसाधारण १२ ते ३५ या वयोगटातील तरुणांच्या श्रवणशक्तीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. कानाच्या अत्यंत जवळून कर्णपटलांवर जोरजोरात आदळणा-या संगीत लहरींनी बहिरेपणा येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. स्मार्ट फोन किंवा अन्य उपकरणांचा वापर करून संगीत ऐकणा-या साठ टक्के लोकांना बहिरेपणाचा सामना करावा लागतो तर सुमारे ४० टक्के लोकांना नाईट क्लब आणि संगीताचे कार्यक्रम ऐकल्याने बहिरेपण येते.

याबाबत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे शेली चड्ढा म्हणाले, ‘बहुसंख्य तरुण मुलांना जोरदार आवाजात संगीत ऐकायला आवडते. हे ध्वनिप्रदूषण त्यांच्या श्रवणशक्तीवर परिणाम करते आणि त्यांना श्रवणशक्ती गमवावी लागते. साउथ आफ्रिकेत २०१० मध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धांच्या वेळी वुवुझेला नावाचे वाद्य स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी वापरण्यात आले होते.

हे वाद्य नऊ सेकंद वाजविल्यास सुमारे १२० डेसिबल्सचा आवाज निर्माण होत होता. या वाद्याचा श्रवणशक्तीवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. ही गोष्ट आपण टाळू शकलो असतो ना? या तरुण मुलांनी लक्षात घ्यायला हवे की, श्रवणशक्ती एकदा गेली की पुन्हा येत नाही.’ ‘गर्दीच्या वेळी होणा-या ध्वनिप्रदूषणानेही बहिरेपणा येऊ शकतो. हे प्रदूषण ८५ डेसिबल्सपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. इयर प्लग्जसारखे उपकरण वापरायचे असेल तर आवाज मर्यादित ठेवणे गरजेचे आहे,’ असेही चढ्ढा यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment